पार्थ चव्हाणच्या उपकरणांची निवड राष्ट्रीय प्रदर्शनासाठी
साधना इंग्लिश मिडियम स्कूलचा गौरव
सातारा
सातारा जिल्ह्याच्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीला नवी उंची मिळाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय INSPIRE अवॉर्ड (मानक) विज्ञान प्रदर्शनात यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी पार्थ चव्हाण यांच्या उपकरणांची निवड थेट राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी करण्यात आली. या भव्य यशामुळे यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सह जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक कार्यक्षमतेला राज्यस्तरावर नवा गौरव प्राप्त झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा, वैज्ञानिक चिंतनाचा आणि सातत्यपूर्ण परिश्रमाचा हा मोठा सन्मान मानला जात आहे.राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात विशेष ठरला तो साधना इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी पार्थ चव्हाण. त्याच्या अभिनव आणि उपयुक्त अशा प्रकल्पाची निवड थेट राष्ट्रीय स्तरासाठी झाली असून संपूर्ण शाळा, मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे. पार्थ चव्हाण याचा विशेष सत्कार संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी प्रा. सगरे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि शोधक वृत्ती योग्य दिशेने मार्गदर्शन मिळाल्यास ती वैज्ञानिक नवकल्पनांमध्ये परिवर्तित होते. पार्थ याचे यश हे त्याचे परिश्रम, मार्गदर्शन आणि विज्ञानावरील प्रेमाची फलश्रुती आहे.”
मुख्याध्यापिका वैशाली धुमाळ, मार्गदर्शक शिक्षिका प्रतिभा गुरव, तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यावेळी उपस्थित होते.
या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक यांचे मा. शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे, विस्तार अधिकारी दत्ता गिरी यांनी अभिनंदन केले. तसेच INSPIRE अवॉर्डसाठी नेहमीच मदतीसाठी तत्पर असणारे जिल्हा समन्वयक लक्ष्मण उबाळे आणि उपसमन्वयक श्रीकांत कुंभार यांचे मोलाचे योगदान आहे.
विज्ञान मित्र मंडळ, सातारा यांनी सर्व निवड झालेल्या शाळांचे, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून राष्ट्रीय पातळीवरील सादरीकरणासाठी पार्थ चव्हाण आणि सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
सातारा जिल्ह्याच्या विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा राष्ट्रीय स्तरावरही चमकवावी, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
फोटो
राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचा गौरव करताना संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, मुख्याध्यापिका वैशाली धुमाळ

