माणिक मोती,एक अमृतानुभव


माणिक वर्मा फाउंडेशन व मिस्टिक मेलडीजचा कार्यक्रम
विशेष लेख /शरद महाजनी

गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या दिवशी संध्याकाळी एक अमृतानुभव आम्ही घेतला,तो माणिक मोती वेचीत. अमृताहूनी गोड अशा माणिक गीतांचा..
अमृताहूनी गोड अशी गाणी गावून ज्यांनी लाखो रसिकांना मंत्रमुग्ध केले अशा ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांची यंदा जन्म शताब्दी.या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर त्यांची गाणी ऐकायला मिळणे हाही अमृतयोगच.तोही जुळून आला माणिकताईंच्या चार कर्तृत्ववान लेकींच्या साक्षीने..नामवंत कलावंत,गायक, गायिका, संगीतकार, वादक यांच्या प्रत्यक्ष सहभागाने..ही संध्याकाळ सुगंधी केली त्या माणिक स्वरांनी, त्यांच्या गोड,भावपूर्ण आठवणींनी..!

Advertisement


माणिक वर्मा फाउंडेशन व मिस्टिक मेलडीजच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हजारो रसिकांच्या साक्षीने साजरा झाला.माणिक वर्मा यांच्या ज्येष्ठ आणि लाडक्या शिष्या सौ. शैला दातार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात रंग भरले ते खुसखुशीत निवेदन,सूत्र संचालन करणाऱ्या संकर्षण कऱ्हाडे यांनी. माणिकताईंचा देदीप्यमान सांगीतिक प्रवास आणि जीवन प्रवास उलगडून दाखवताना शैलाताई आणि संकर्षण यांना साथ लाभली ती माणिकताईंनी लोकप्रिय केलेली अवीट गोडीची माणिक गीते सुरेल आवाजात सादर करणाऱ्या सावनी दातार कुलकर्णी,शिल्पा दातार पुणतांबेकर, मधुरा दातार, ओंकार दादरकर या गायकांची. शैला दातार, भारती आचरेकर,राणी वर्मा,वंदना गुप्ते यांनी पण माणिकताईंची गाणी सुरेल स्वरात गाऊन त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी,किशोरी आमोणकर,संगीतकार गायक सुधीर फडके, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,ज्येष्ठ गायिका गंगुबाई हनगल, पु. ल.देशपांडे या मान्यवरांनी माणिक ताईंचा केलेला गौरव, संगीतकार गोविंदराव टेंबे,सुधीर फडके,वसंत पवार, दशरथ पुजारी, बाळ माटे,मधुकर गोळवलकर,विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली ग.दि. माडगूळकर,राजा बढे,काकासाहेब खाडिलकर,शांता शेळके यांची गाणी हे या मैफिलीचे खास वैशिष्ट्य.या शिवाय बेगम अख्तर, जयपूरवाले यांच्यास्वतः माणिक ताईंनी गायलेल्या बंदिशी, ठुमरी,अभंग,भावगीते,नाट्य गीते,लावणी यांची झलक पण ऐकायला मिळाली.ज्येष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे,तबला वादक समीर पुणतांबेकर,डॉ.राजेंद्र दुरकर,हार्मोनियम वादक वरद सोहनी. सिंथेसायझर वादक तुषार दीक्षित,ताल वाद्य वादक आदित्य आपटे यांची साथही मोलाची.
माणिक वर्मा यांच्या तीन कन्या,शैला दातार, ओंकार दादरकर यांनी सांगितलेल्या आठवणीतून माणिक वर्मा या परिपूर्ण,सर्वांगसुंदर व्यक्तिमत्वाची ओळख रसिकांना आनंद देऊन गेली,त्याची पोच पावती त्यांच्या टाळ्यांनी दिली.सुमारे साडे तीन तास रंगलेला हा आनंद सोहळा माणिक ताईंनी गायलेल्या ‘कैसे जाऊँ जमुना के तीर ‘ या अजरामर भैरवीने झाला.रसिकांनी या महान गायिकेला विनम्र अभिवादन करून निरोप दिला,पण तेव्हाही त्यांच्या मनात माणिक गीतांचे स्वर घर करून बसले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!