साताऱ्यात सायबर सुरक्षेवर प्रबोधनात्मक नाट्य
सातारा :
क्विक हिल फाउंडेशन आणि कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने रयत को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा येथे इन्स्टिट्यूट मधील संगणक विभागातील सायबर वॉरियर्स विद्यार्थ्यांकडून सायबर सुरक्षेवरील विशेष प्रबोधनात्मक नाट्य सादर करण्यात आले.
या नाट्यप्रयोगातून सायबर गुन्हेगारी, सोशल मीडिया फसवणूक, सोशल इंजिनीयरिंग, आणि डिजिटल सुरक्षितता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रभावी प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वास्तवातील उदाहरणांद्वारे सायबर सुरक्षेबाबत सजगतेचा संदेश दिला.
हे सादरीकरण रयत को-ऑपरेटिव्ह बँक, सातारा चे सभासद यांच्यासमोर करण्यात आले. उपस्थितांना सायबर धोके आणि त्यावरील सुरक्षिततेच्या उपाययोजना याबाबत माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी ‘सायबर सेफ शपथ’ घेतली.
या शपथेद्वारे डिजिटल व्यवहार करताना सुरक्षिततेची काळजी घेणे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करणे आणि सायबर गुन्ह्यांविषयी सजग राहणे याची प्रतिज्ञा करण्यात आली.
या उपक्रमामागे संस्थेचे संचालक डॉ. बी. एस. सावंत यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन आणि सक्रीय सहकार्य लाभले.
त्यांच्या पाठबळामुळे हा उपक्रम प्रभावीपणे पार पडला.
कार्यक्रमाचे नियोजन व समन्वयाची जबाबदारी कॉम्प्युटर विभाग प्रमुख डॉ. आर. डी. कुंभार आणि प्रा. पी. ए. लोखंडे यांनी समर्थपणे पार पाडली.
त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेची गरज, जबाबदारी आणि प्रत्यक्ष आयुष्यातील सुरक्षिततेचे उपाय याबाबत मार्गदर्शन करून उपक्रम अधिक परिणामकारक बनवला.

