प्रा. डॉ. राजा दीक्षित यांच्याकडे वैश्विक दृष्टी – किशोर बेडकिहाळ
” कुरबॅश आणि इतर कविता ” या कवितासंग्रहाचे साताऱ्यात लोकार्पण
सातारा,
प्रा. डॉ. राजा दीक्षित यांची जी दृष्टी आहे ती वैश्विक आहे, सगळ्यांना सामावून घेणारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले.
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष व वाईच्या ‘ नवभारत ‘ चे माजी संपादक प्रा. डॉ. राजा दीक्षित यांच्या पुणे येथील संवेदना प्रकाशन यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या ” कुरबॅश आणि इतर कविता ” या कवितासंग्रहाचे लोकार्पण कार्यक्रम ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून कवी व पुणे येथील जेष्ठ पत्रकार स्वप्निल पोरे, कवी व समीक्षक प्रा.देवानंद सोनटक्के, कवयित्री व अभ्यासक शिल्पा चिटणीस या उपस्थित होत्या. पुणे येथील संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे, कवी व कार्याध्यक्ष, साहित्यदीप प्रतिष्ठान, पुणे धनंजय तडवळकर, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चे कार्यवाह शिरीष चिटणीस आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
किशोर बेडकिहाळ पुढे म्हणाले, छोट्या छोट्या गोष्टींची स्मृती प्राध्यापक डॉ. राजा दीक्षित यांनी कवितेच्या माध्यमातून जागी केली. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर जे संस्कार आहेत, ते वैश्विक प्रकारचे आहेत. ते सगळ्यांना सामावून घेणारे आहेत. कोणतेही पंथ न मानणारे राजा दीक्षित हे व्यक्तिमत्व आहे. कविता ही लोकांना अर्पण केल्यावर लोकांनी त्याचा अन्वयार्थ लावावा. कुठे ना कुठे कवीचे आत्मचरित्र कवितेत डोकावतच असते. निरनिराळ्या कालावधीतील तुकडे एकत्र करून एकसंध कवितासंग्रह त्यांनी निर्माण केलेला आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित यांनी प्राथमिक शाळेत असतानाच पहिली कविता केली. बा.सी. मर्ढेकर प्राथमिक शाळेत असतानाच त्यांनीही कविता केली होती. डॉ. दीक्षित हे संवेदनशील कवी आहेत असे मला वाटते. प्राध्यापक दीक्षित महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष असून यांच्यासारखी अभ्यासू माणसे सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहिली तर ते आमचे भाग्य आहे. म्हणूनच मी त्यांना या संमेलनासाठी सन्मानपूर्वक बोलवत आहे.
स्वप्निल पोरे म्हणाले, पुस्तकांचा लोकार्पण सोहळा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये झाला पाहिजे ही शिरीष चिटणीस यांनी मांडलेली कल्पना खूप चांगली असून पुस्तक लोकार्पण सोहळ्यांच्या कल्पनेला सगळ्यांनी पाठबळ दिले पाहिजे. राजा दीक्षित यांच्या कविता किती उंचीच्या आहेत याची पावती सदानंद मोरे यांनी दिलेली आहे. दीक्षित सरांच्या कवितेमधील शब्दांचा चाबूक हा संवेदनाहीन झालेल्या माणसाला जागे करण्यासाठी आहे. त्यांच्या कविता म्हणजे काही दशकांच्या अस्वस्थतेचे कारण म्हटले पाहिजे.
प्रा. देवानंद सोनटक्के म्हणाले, चांगल्या कवीची कविता काळाची मर्यादा ओलांडून पुढे जाते. राजीव दीक्षित यांच्या कविता उत्तम, वैचारिक आहेत. कवीचं स्वतःचं एक मन, व्यक्तिमत्व, भूमिका, प्रयोजन असते. दीक्षित सर यांच्या कवितेची मांडणी उत्तर आधुनिकता वादाकडे गेलेली दिसते. विंदा करंदीकर व बा.सी. मर्ढेकर यांच्या आकृतीबंधाचा प्रभाव त्यांच्या कविता वर झालेला दिसतो.
शिल्पा चिटणीस म्हणाल्या, अन्याय, शोषण, गुलामगिरी यांच्यामुळे दीक्षित सरांचे मन विषन्न झाले होते म्हणूनच त्यांनी याविरुद्ध चाबकाचे आसूड ओढणाऱ्या कविता लिहिलेल्या आहेत. वयाच्या नवव्या वर्षापासून 61 व्या वयापर्यंत त्यांचा काव्यसंग्रहाचा प्रवास सुरू होता. हा कवितासंग्रह एका वेगळ्याच धाटणीचा मनाला आनंद देणारा आहे.
प्रास्ताविकात शिरीष चिटणीस म्हणाले, दीक्षित सर व किशोर बेडकीहाळ तसेच प्राध्यापक देवानंद सोनटक्के यांचे संबंध वैचारिक दृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्यांचे विषयी जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. त्यांचे विचार ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये एक प्रकारची परिपक्वता, प्रगल्भता निर्माण झाली.
नितीन हिरवे म्हणाले, दीक्षित सरांनी कॉलेजमध्ये लिहिलेल्या कवितांचे 50 वर्षानंतर प्रकाशन होत आहे. वाचकांना नेहमी वेगवेगळे लागते. नवीन साहित्यप्रकार नेहमी वाचकांना भावत असतो.
धनंजय तडवळकर यांनी दीक्षित सरांची ” चकोर ” ही कविता सादर केली. 80 च्या दशकातील त्यांनी “आज दवा तुनी तुझी स्पंदने ” तसेच ‘ नंगे ‘ या कवितेचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दत्तात्रय पाटील व रमेश महामुलकर यांनी राजा दीक्षित यांच्या ‘ उन्हाचे किनारे ‘ व ‘ गर्वगीत ‘ या कवितांचे तबला पेटीच्या तालावर संगीतमय सादरीकरण केले. कार्यक्रमास डॉ. राजेंद्र माने, आनंदा ननावरे, गौतम भोसले, अशोक काळे, प्राचार्य वि.ना. लांडगे, क्षितिजा पंडित, पारसनीस मॅडम, दिनकर झिम्बरे, ज्योती नलवडे, ज्ञानेश्वर मोहटकर, संदीप जाधव, हणमंत खुडे, बाळकृष्ण इंगळे, शुभम बल्लाळ, जगदीश खंडागळे आदि उपस्थित होते

