समृद्ध पालकत्व ‘च्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा ,वाचक व्यासपीठ उपक्रमांतर्गत डॉक्टर आदिती काळमेख यांच्या ‘समृद्ध पालकत्व ‘या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते आणि साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने ,ऍड सीमा नुलकर ,बालरोग तज्ञ डॉक्टर स्वाती श्रोत्री ,वाचनालयाचे अध्यक्ष अनंत जोशी ,कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी ‘ समृद्ध पालकत्व ‘ या पुस्तकावर मत व्यक्त करताना राजेंद्र चोरगे म्हणाले हे पुस्तक शाळेतील सर्व पालकांनी वाचावे म्हणून शाळेमध्ये सुद्धा पालकांची शाळा हा उपक्रम चालू करून त्यामध्ये हे पुस्तक पालकांना दिले गेले . त्याचे चांगले सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे हे पुस्तक पालकांना उत्तम मार्गदर्शन करणारे आहे.
यावेळी डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले ‘पालकत्व ही जोखीम असते तशीच जबाबदारी असते.पालकत्वाचे स्वरूप व्यापक असते. पालकत्वाबाबत असणाऱ्या समस्या या महाभारत काळापासून चालू आहेत अगदी कुंती, गांधारी यांनाही पालकत्वाच्या समस्या होत्या .आजकालचा भोवताल बदललेला आहे, प्रश्न बदललेले आहेत त्यामुळे पालकत्वांमध्ये येणाऱ्या समस्या ही बदललेल्या आहेत. मुलांची मानसिकता बदलती आहे मुलांना समजून घेणे आणि त्यांना पालक म्हणून आश्वस्त करणं ही काळाची गरज आहे.मुले म्हणजे आपली संपत्ती किंवा जहागीर नसते त्यांना त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आणि व्यक्तिमत्व असतं. फक्त ते चांगले घडेल याचा प्रयत्न करत राहणं गरजेचं असतं. यासाठी वेळोवेळी पालकत्व सुद्धा अपडेट करण्याची गरज आहे डॉक्टर आदिती काळमेख यांनी लिहिलेले पुस्तक पालकत्वासाठी एक सजग दीपस्तंभ बनू शकते.असे पुस्तक लिहिताना लेखकाच्या ठिकाणी असणारी संवेदनशीलता महत्त्वाची असते ती डॉक्टर काळमेख यांचे ठिकाणी आहे. त्यामुळे पुस्तकाची भाषा आणि त्यातली उदाहरणे पटणारी आहेत. वाचणाऱ्याला त्याच्या परिस्थितीशी संलग्न ठरणारी आहेत. म्हणून हे पुस्तक महत्त्वाचे आहे .
ॲड सीमा नुलकर म्हणाल्या,पालक म्हणजे फक्त जैविक पालक नाही. पालक यां संकल्पनेत आजीआजोबा, सावत्र पालक, कायदेशीर पालक, समाज असे सगळे येतात. सगळे मिळून मुलाच्या संगोपनाला कारणीभूत असतात.अगदी लहान मुलं ही लैंगिक अत्याचार, भावनिक, शारीरिक छळाची बळी,सायबर गुन्ह्याची बळी ठरतात. मुलावर पालकांचे पैसे खाणे, आर्थिक घोटाळे करणे, मुलीची संपत्तीचे प्रदर्शन करणारी डेस्टिनेशन वेडिंग किंवा घरात नवीन लग्न होऊन आलेल्या मुलीचा अमानुष छळ पाहून अतिशय वाईट परिणाम होतात.पालकत्व ही मत प्रदर्शन करण्यासाठी सर्वात सोपी गोष्ट आणि निभावण्यासाठी सर्वात अवघड गोष्ट असते.समृद्ध पालकत्व म्हणजे अशा सगळ्या बाबींचा विचार करून, हटाळून केलेले संगोपन
डॉक्टर स्वाती श्रोत्री यांनी लहान मुलांच्या डॉक्टर म्हणून त्यांचे मत व्यक्त केले त्या म्हणाल्या मुलांची मानसिकता बदलती आहे त्यांना वेळ देणे गरजेचे आहे समजून घेणे गरजेचे आहे आणि संवाद साधणेही गरजेचं आहे मुलं जे सांगू इच्छितात ते पालकांनी शांतपणे ऐकून घ्यायला हवं आणि मग त्याच्यावर विचारपूर्वक मत व्यक्त करायला हवं हे पुस्तक त्यासंबंधी योग्य मार्गदर्शन करायला मदत करते
कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप वाचनालयाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंतराव जोशी यांनी केला आणि एक उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल डॉक्टर आदिती यांचे अभिनंदन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर श्याम बडवे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदीप कांबळे यांनी केले
या कार्यक्रमाला किशोर बेडकीहाळ डॉक्टर प्रसन्न दाभोळकर डॉक्टर चित्रा दाभोळकर डॉक्टर ज्योत्स्ना कोल्हटकर सचिन प्रभुणे सागर गायकवाड लता चव्हाण सचिन तिरोडकर अनील वीर श्रीधर साळुंखे पद्माकर पाठकजी आनंद ननावरे गौतम भोसले सविता कारंजकर अमित काळमेख उपस्थित होते