ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध


महाराष्ट्राचं वैभव पूर्ववत करण्याचे आश्वासन

मुंबई
भाजपची अवस्था विचित्र झाली आहे. भाजपला पराभव समोर दिसायला लागल्यानंतर ते आता राम राम म्हणायला लागले आहेत. सुरुवातीचे काही वर्षं ठीक होतं, पण नंतर तशी परिस्थिती राहिली नाही. भाजपची पाशवी बहुमत मिळवण्याची इच्छा आता हळूहळू उघड होऊ लागली आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी ते बोलत होते. “काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा सादर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनीही जाहीरनामा जाहीर केला आहे. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की आवश्यकता असेल तरच आम्ही वचननामा जाहीर करू. त्यानुसार आम्ही आता आमचा वचननामा प्रकाशित करत आहोत,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रातील उद्योग, क्रिकेटची मॅच, हिरे बाजार सगळं काही पळवलं जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात जे महाराष्ट्राचं वैभव वाढत होतं ते आम्ही पूर्ववत करणार आहोत.आता इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येईल आणि काही महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात येईल. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक राज्याचा सन्मान ठेवला जाईल. महाराष्ट्रातील वित्तीय केंद्रे आम्ही नव्याने उभी करू. शहरांसोबतच ग्रामीण भागात नोकरीच्या संधी आम्ही निर्माण करू.”
आरोग्य व्यवस्थेबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, “कोरोनाकाळात आम्हाला आरोग्य व्यवस्थेतील उणिवा जाणवल्या. त्यानुसार जिल्हा रूग्णालयांचं आधुनिकीकरण करू.

Advertisement

प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवू. इंडिया आघाडीचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे. महाराष्ट्रात आम्ही शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्त करून थांबणार नाही तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिकविम्याचे निकष बदलून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळाली पाहिजे यावर आम्ही विशेष लक्ष देऊ.
शेतकऱ्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्यात खतं आणि शेतीची उपकरणं असतात, त्या सगळ्या गोष्टी आम्ही जीएसटीमुक्त करू. शेतकऱ्यांसाठी गोदामं बांधली जातील जिथे गरज आहे तिथे शीतगृहं बांधली जातील. शेतकऱ्याला बाजाराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषी खात्याच्या अंतर्गत एक संशोधन आणि सर्वेक्षण केंद्र उभं करण्यात येईल. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!