सातारच्या बदल्यात राज्यसभा


राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती
मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद असलेली सातारची जागा भाजपाकडे गेली आहे. या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे,अशी माहिती पक्षच नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील 10 जागांवर दावा सांगितला होता. प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या हातात बारामती, शिरूर, रायगड, उस्मानाबाद या चार जागा आल्या आहेत. परभणीच्या जागा महादेव जानकर यांना देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांच्या माघारीमुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे राहील याची शाश्वती राहिलेली नाही.
महायुतीच्या जागावाटपात साताराच्या जागेवर अजित पवार गटाने दावा सांगितला होता. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येत आहे. सध्या इथे राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार आहेत. मात्र ते शरद पवार गटाबरोबर आहेत. असे असले तरी सातारा हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने अजित पवार गटाने त्यावर हक्क सांगितला होता. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातून लोकसभेची निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी थेट दिल्लीत जात अमित शहांची भेटही घेतली होती. या भेटीनंतर भाजपाने उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कमोर्तब केले. त्यामुळे राष्ट्रवादीला साताराच्या जागेवरील आपला दावा मागे घ्यावा लागला.
गोयल हे भाजपाकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते लोकसभेवर निवडून येतील, असे गृहीत धरून राष्ट्रवादीला आश्वासन देण्यात आले आहे. गोयल हे जून 2022 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. जर गोयल विजयी झाले तर त्यांना 15 दिवसाच्या आत राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची चार वर्षांची मुदत बाकी आहे. मात्र, गोयल यांचा पराभव झाला तर राष्ट्रवादीला राज्यसभा कशी मिळणार याबाबत स्पष्टता नाही.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!