सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी रणजीतसिंह देशमुख


सातारा,
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी रणजीतसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्राद्वारे आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करीत ही नियुक्ती जाहीर केली.
सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या रिक्त जागेच्या नियुक्तीसाठी हालचाली गतिमान झाल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील चर्चेतून देशमुख यांचे नाव पुढे आले, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम यांनीही त्यांच्या नावाला पाठींबा दिल्याने एकमताने देशमुख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
जिल्हाध्यक्षपदी देशमुख यांची निवड जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात ते कार्यकर्त्यांच्या एका विशेष मेळाव्याद्वारे पदभार स्वीकारणार आहेत. या मेळाव्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील आमदार विश्वजीत कदम, डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती असेल
श्री देशमुख यांनी यापूर्वी जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. तत्कालात दुष्काळी परिस्थितीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचा माण व खटाव तालुक्यांचा दौरा घडवून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्याचा प्रयत्न केला होता. पुणे येथील प्रसिद्ध आय.एल.एस विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली असून पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
वडील दिवंगत धैर्यशीलराव देशमुख हे खटाव तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या विधायक – राजकीय कार्याचा वारसा पुढे चालवताना श्री. देशमुख यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यात हरणाई सहकारी सूतगिरणीची आणि माण तालुक्यात माणदेशी सहकारी सूतगिरणीची यशस्वी उभारणी करून त्यांनी सूत निर्मिती उद्योगात राज्य आणि देशपातळीवर विशेष लौकिक संपादन केला आहे. सध्या ते काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम पहात आहेत. अत्यंत अडचणीच्या काळात काँग्रेस बरोबर राहत त्यांनी पक्षाच्या राज्य पातळीवरील अनेक नेत्यांशी विशेष स्नेहाचे संबंध जोपासले आहेत.

Advertisement

दरम्यान, उच्चविद्या विभूषित – चारित्रसंपन्न, निष्ठावान कार्यकर्त्याची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्ह्यातील काँग्रेसजनांत आनंद व्यक्त होत आहे.
देशमुख यांच्या या नियुक्तीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आमदार सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजितराव पाटील चिखलीकर, प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, बाबासाहेब कदम, ॲड. विजयराव कणसे, अच्युतराव खलाटे, मनोहर शिंदे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, झाकीर पठाण, एम. के. भोसले, रजनीताई पवार, जयदीप शिंदे, महेंद्र सूर्यवंशी, अल्पना यादव, नीलम येडगे, विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, जगन्नाथ कुंभार, नरेश देसाई, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत कांबळे, सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत करून अभिनंदन केले आहे.

.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!