देशमुखांची कविता प्रचंड आशावादी 


प्रकाशन समारंभात प्रा.डॉ. देवानंद सोनटक्के यांचे प्रतिपादन

Advertisement

सातारा
केशव सखाराम देशमुख यांची “लाकडाचे कान” काव्यसंग्रहातील कविता मूल्यांवर विश्वासअसणारी आणि प्रचंड आशावादी कविता आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के यांनी केले.
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, सातारा आयोजित डॉ. देशमुख यांच्या ‘लाकडाचे कान’ या नव्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात डॉ. सोनटक्के बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ ग्रामीण लेखक प्रा. संभाजी लावंड, पुणे म.सा.प.चे कार्यवाह श्री. शिरीष चिटणीस, कवी केशव सखाराम देशमुख, डॉ. अदिती काळमेख, शिल्पा चिटणीस उपस्थित होते.
डॉ. सोनटक्के म्ह‌णाले की, नव्वदोत्तरी मराठी कवितेत फार वरचे स्थान असलेली डाॅ. देशमुखांची ही कविता मराठी भाषेच्या आविष्कारांची अनेक रूपे दर्शविणारी कविता असून एकात्म कवी मन असलेल्या ह्या त्यांच्या समग्र कविता एकात्मतेचा उद्गार म्हणून मौलिक मानाव्या लागतील.
डॉ. केशव सखाराम देशमुखांच्या एकंदर कवितेबद्दल अत्यंत मर्मग्राही आणि अभ्यासपूर्ण चिंतन प्रकट करताना डॉ. सोनटक्के पुढे म्हणाले, संतपरंपरेशी नाते जोडणारी ही कविता आहे. आज समाजात भोवतालात भरुन असलेले जे एक मुकेपण आहे; त्याबद्दलची ‘लाकडाचे कान’ मधील कविता ही समकालीन, वास्तविक, साधी,सभ्य आणि सरल कविता आहे.
यावेळी कवी केशव सखाराम देशमुख यांनी याप्रसंगी आपल्या काव्यलेखनविषयक एकूणच निर्मिती प्रक्रिया आणि त्यांच्या एकूण काव्य निर्मिती बद्दल सटीक भाष्य केले.
समारंभाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते “लाकडाचे कान” संग्रहाचे प्रकाशन झाले ते ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी देशमुखांच्या काव्यसंग्रहाची सविस्तर, अभ्यासपूर्ण मीमांसा केली. ते म्हणाले, ‘लाकडाचे कान’ मधील कवितेत हा कवी कुठेही सभ्यता सोडत नाही. स्वतःचा आवाज आणि स्वतःचा कान शाबूत ठेवत काव्यलेखन करणारे डाॅ. केशव सखाराम देशमुख जे जे सलते , जे जे खुपते आणि जे जे खरवडले जाते; त्याबद्दल अलंकार , उपमा यांत मुळीच न अडकता या कवितामधून सहजपणे जीवनभाष्यच करतात.देशमुखांच्या कवितेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कविता आकांताची नसून एकांताची कविता आहे. स्वतःशी संवाद साधणारी ही त्यांची कविता मातीशी जोडलेली, मातीची कविता असून मातीला सर्वस्व मानणारी ही कविता आहे. थेट आशयाशी भिडायला या कवितेला आवडते.
देशमुखांच्या या कवितेचे विवेचन करताना बेडकिहाळ आणि डॉ. सोनटक्के या दोन्ही मान्यवरांनी ‘लाकडाचे कान’ काव्यसंग्रहातील ओढ, एकटं, भिजणं, जीभ, नाहीनशि,बाजार, गवताचे पाते, हातावर, धुके, अंतिम, आकार, जीभ, खेकडा, लाकडाचे कान, धैर्य, अघटित, कासवाचे पाय, हॉर्नबील : अशा एक नव्हे तर अनेक कवितांचे साक्षेपाने संदर्भसंपन्न विवेचन यावेळी केले. प्रा. संभाजी लावंड यांचेही यावेळी काव्यपरंपरा आणि देशमुखांची कविता या अनुरोधाने भाषण झाले. पुणे मसापचे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी मराठी काव्य, समाज, संस्कृती यांचा धांडोळा घेणारे नेटके प्रास्ताविक करून प्रकाशन समारंभाची उंची वाढवीत नेणारे सूत्रसंचालन केले.
प्रकाशन समारंभाचा एक अभिनव प्रयोग म्हणून डॉ. अदिती काळमेख आणि शिल्पा चिटणीस यांनी ‘लाकडाचे कान’ काव्यसंग्रहातील काळ, जन्म, लाकडाचे कान, असह्य, ज्याचे त्याचे गाणे, भगभगीत, सुकाळ, लाही, अचानक : ह्या काही निवडक कवितांचे अभिवाचन करून समारंभात उत्तम रंगत आणली. तर दत्तात्रय सावंत आणि रमेश महामूलकर यांनी देशमुखांच्या कवितांना स्वरसाज चढवत निवडक कवितांचे संगीतबद्ध गायन केले. सातारा शहरातील कलावंत, साहित्यिक, रसिक, वाचक यांनी मोठी गर्दी करीत प्रकाशनसमारंभाची गोडी अधिक गोड केली. संगिता हेंद्रे यांनी आभार मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!