हुसेन यांच्या  चित्रांच्या लिलावावर बंदी घाला 


 अन्यथा तीव्र आंदोलन करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी
मुंबई
१४० कोटी भारतियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या भारतमातेचे ‘रेप ऑफ इंडिया’ नावाने अत्यंत विकृत, बिभत्स, नग्न व अश्लील चित्र रेखाटणारे वादग्रस्त चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या अन्य २५ चित्रांचा लिलाव १२ जून २०२५ रोजी मुंबईतील हॅमिल्टन हाऊस येथील ‘पांडोल आर्ट गॅलरी’द्वारे होणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या लिलावावर तात्काळ बंदी घालावी व हुसेन यांच्या गुन्हेगारी कृत्याचे उदात्तीकरण बंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.
या निवेदनात हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे की, एम.एफ. हुसेन यांनी २६/११ च्या वेळी ‘रेप ऑफ इंडिया’ नावाच्या चित्रात भारतमातेचा नग्न व अपमानास्पद चित्र साकारून त्यांनी देशद्रोहाची परिसीमा गाठली आहे. तर दुसऱ्या एका चित्रात भारतमातचे नग्न चित्रण काढून त्यावर विविध शहरांची नाव लिहिलेली दाखवली आहेत. अन्य चित्रांमध्ये नग्न हनुमंताच्या शेपटीवर बसलेली नग्न सीता; एका चित्रात नग्न हनुमान, नग्न राम व नग्न सीता यांना एकत्र दाखवले आहेत; श्री गणेशांना एका नग्न स्त्रीच्या मांडीवर बसवलेले; तर एका चित्रात भगवान हनुमानांना एका नग्न स्त्रीला हातात घेऊन उडताना दाखवलेले आहे. अशा प्रकारे माता सरस्वती, माता पार्वती, माता गंगा, माता यमुना आदी देवीदेवतांचे जाणीवपूर्वक विकृत, नग्न व अश्लील चित्रण करून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा घोर अपमान केला आहे. या अपमानास्पद चित्रांच्या विरोधात हुसेनवर देशभरात १२५० हून अधिक पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळेच देशभरात त्यांच्या प्रदर्शनांना विरोध झाला आणि अखेर हुसेन यांनी भारतातून पलायन करून कतारचे नागरिकत्व स्वीकारले होते.
समितीने पुढे म्हटले आहे की, २५ चित्रांचा लिलाव म्हणजे त्यांच्या आधीच्या राष्ट्रविरोधी व समाजविघातक कृत्यांना अप्रत्यक्षपणे समर्थन देणे होय. ‘कलात्मक स्वातंत्र्य’ या नावाखाली धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणि देशविघातक व्यक्तींचे गौरव करणे हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय नाही. नुकतेच दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयाने हुसेन यांच्या प्रदर्शनातील चित्रे जप्त करण्याचे आदेश दिले असून त्याची चौकशी चालू आहे. यापूर्वी देशभरात हुसेन यांच्या अनेक चित्रप्रदर्शनांना विरोध झालेला आहे. ती प्रदर्शने रद्द झालेली आहे. हुसेनच्या नावाने दिले जाणारे पुरस्कारही रद्द करण्यात आले आहेत.
हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे की, एम.एफ. हुसेन यांच्या चित्रांचा प्रस्तावित लिलाव व विक्री त्वरित थांबवावी व त्यावर कायदेशीर बंदी घालावी. या चित्रांचे प्रदर्शन किंवा विक्री करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा कला गॅलरींवर कायद्यानुसार कारवाई करावी. राष्ट्रीय व धार्मिक भावना दुखावणाऱ्या चित्रकृतींच्या प्रसारावर बंदी आणावी, तसेच हुसेन यांच्या भारतमातेच्या चित्राला देशविरोधी घोषीत करावे, अशी मागणी समितीने केली आहे.
फोटो ओळ
निवेदन देताना रविंद्र दासारी, अधिवक्ता सुदर्शन गजम, अधिवक्ता अनिश परळकर, श्री. बळवंत पाठक व निवेदन स्वीकारताना मुंबईचे अपर जिल्हाधिकारी श्री. रवी रतन कटकधोंड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!