शास्त्रीय संगीतासोबत पाश्चात्य संगीताचा आविष्कार


मासिक संगीत सभेत रसिकांना आगळी वेगळी मेजवानी
सातारा
द्रविड ऑफिस येथे संपन्न झालेल्या मासिक संगीत सभेत रसिकांना शास्त्रीय संगीतासोबत पाश्चात्य संगीताचा आविष्कार अनुभवायला मिळाला.
प्रथम सत्रात द ब्लु नोट गिटार अकादमीचे प्रमुख प्रतीक सदामतेआणि त्यांचे सहकलाकारांनी गिटार या पाश्चिमात्य वाद्याचे भारतीय संगीतातील स्थान सांगत कर्ज, शोले, आर.डी. बर्मन, मराठी संगीत आदींची झलक दाखवून त्यानंतर प्रसिद्ध संगीतकार एरीक क्लम्पटन यांच्या काही प्रसिद्ध कंपोझिशन्स सादर केल्या, जेसीका-हॉटेल कॅलिफोर्निया, कॉन्व्हरसेशन सारखी जगप्रसिद्ध गाणी सादर केली. अकॉस्टिक गिटार, इलेक्ट्रिक गिटार यातील फरक समजावून सांगत रिदम आणि लीड यातील बारकावे सफाईदारपणे सादर केले. त्यांचेसोबत आलेल्या अमित जाधव यांनी प्रत्येक कम्पोझिशन ला ‘जेम्बे’ या पारंपरिक आफ्रिकन तालवाद्याने सुरेख साथ केली. या वाद्याची माहिती नमूद करत त्यांनी पर्शियन, आफ्रिकन, अरेबिक तसेच पंजाबी, तीनताल आदी ताल आकर्षकरित्या सादर केले.

Advertisement


द्वितीय सत्रात गुरुवर्य संजय दीक्षित सरांचे शिष्य युवा कलाकार वैभव फडतरे यांनी ‘चांदनी केदार’ हा दोन निषादांच्या अप्रचलित राग सादर केला. बडा ख्याल सादर करताना संयत आलाप घेत आणि त्यानंतर मिंडचा वापर करत सफाईदार ताना सादर करीत त्यांनी रागाची रुची वाढवली, त्यानंतरचा छोटा ख्याल देखील तितक्याच प्रगल्भतेने सादर केला. ‘सुखाचे हे सुख’ आणि ‘पद्मनाभा नारायणा’ या रचनांच्या सादरीकरणाने त्यांनी सत्राला विराम दिला. त्यांना सुरेल संवादिनी साथ कु. स्वरा किरपेकर आणि तबला साथ श्री. मिलिंद देवरे सरांनी केली.

वरुणराजाची कृपा लाभलेला सातारा चिंब भिजत असताना रसिकांनी गर्दी करून या सभेचा आनंद लुटला. या सभेला संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मासिक संगीत सभेची संकल्पना आणि संयोजन ऍड. अमित द्रविड यांचे असून या मासिक उपक्रमास जास्तीत जास्त रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!