गौरव मराठा यांची यशोदा इन्स्टिट्यूटसला भेट


मराठा समाजामध्ये सुसंवाद निर्माण करण्याचा हेतू
सातारा

कर्नाल (हरियाणा) येथील छत्रपती शिवाजी महाराज विश्व परिषदेचे अध्यक्ष गौरव मराठा यांनी नुकतीच सातारा शहरास सदिच्छा भेट दिली. या भेटीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पानिपत येथे मराठा व मुस्लिम शासक अबदाली यांच्यात १४ जानेवारी रोजी झालेल्या ऐतिहासिक आणि महाभयंकर युद्धाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी पानिपत येथे साजरा करण्यात येणाऱ्या मराठा शौर्य दिनाची माहिती देणे तसेच महाराष्ट्र व हरियाणा येथील मराठा समाजामध्ये सुसंवाद व एकात्मता निर्माण करणे हा होता.गौरव मराठा यांनी यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे भेट देऊन संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे सर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिक्षण क्षेत्रातील उपक्रम, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांवर चर्चा झाली. समाजाच्या सर्वांगीण विकासात शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Advertisement

या दौऱ्यादरम्यान श्री. गौरव मराठा यांनी सातारा येथील मराठा क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी यांच्याशी सखोल संवाद साधला. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज यावेळी त्यांनी अधोरेखित केली. समाजातील युवकांना इतिहासाची जाणीव करून देत संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यानंतर सर्व मान्यवरांनी पोवई नाका येथे असलेल्या शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुढे जलमंदिर येथे जाऊन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन विविध सामाजिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेत मराठा समाजाच्या प्रश्नांवर सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज विश्व परिषद, पानिपत (हरियाणा) चे अध्यक्ष श्री. गौरव मराठा यांचा यशोदा समूहाच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी संजय कदम, ऍड. उमेश शिर्के, सातारा मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी श्री. राजेंद्र बर्गे, भोईटे, सौ. पाटील, देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
या दौऱ्यामुळे महाराष्ट्र व हरियाणा येथील मराठा समाजातील बंध अधिक दृढ होऊन भविष्यात संयुक्त उपक्रमांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!