अष्टगंधारमध्ये गायक मोहम्मद अझीझ यांची गाणी
दीपलक्ष्मीआणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुपचा उपक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग सहावा दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित केला गेला. हा कार्यक्रम दर्द ए आवाज अशी ओळख असणाऱ्या गायक मोहम्मद अझीझ यांच्या गाण्यांवर आधारित होता. तसेच रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे विलास जावळे यांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्री. श्याम बडवे, श्री सुनील साबळे, गीतांजली पाटील तसेच दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित होते.
डॉ श्याम बडवे यांनी संगीत हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी चिटणीस म्हणाले,मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश या महान गायकांच्या नंतरच्या पिढीत त्यांच्याच आवाजाची नक्कल करणारे अनेक गायक पुढे आले. हॉटेलांपासून ऑर्केस्ट्रापर्यंत अनेक ठिकाणी प्रतिकिशोर, प्रतिरफी, प्रतिमुकेश यांची चलती होती. नक्कल करणाऱ्या कलावंताला फारसे भविष्य नसते.परंतु मोहम्मद रफी, किशोर कुमार यांची नक्कल करणाऱ्या अर्धा डझनाहून अधिक गायकांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केले, यावरून रफी-किशोर यांचा किती प्रभाव होता ते लक्षात येते. मोहम्मद अजीज हे त्याच ‘आभासी’ परंपरेतले एक प्रमुख नाव. बंगालमधील एका खेड्यात जन्मलेल्या मोहम्मद अजीज यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती आणि मोहम्मद रफी हे त्यांचे आवडते गायक होते. रफी यांच्या पठडीतील आवाजाच्या शब्बीर कुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आधीच बस्तान बसवले होते, अशा काळात संगीतकार अन्नू मलिक यांनी मोहम्मद अजीजना पुढे आणले. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या ‘मर्द’ चित्रपटात मोहम्मद अजीजनी गायलेले ‘मर्द टांगेवाला’ हे गाणे शब्बीरकुमार यांचे आहे, असे अनेकांना वाटे, यावरून दोघांच्या आवाजातील साम्य कळावे. कोलकात्यातील हॉटेलमधून गायक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. ‘ज्योती’ या बंगाली चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्याचवर्षी (१९८४) ‘अंबर’ या हिंदी चित्रपटात त्यांना पार्श्वगायनाची संधी मिळाली. कल्याणजी-आनंदजींपासून जतीन-ललितपर्यंत अनेक संगीतकारांकडे त्यांनी पार्श्वगायन केले आणि अनेक हिट गाणी दिली. तरीही हिंदीत दीर्घकाळ वर्चस्व गाजवणाऱ्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे ते विशेष आवडीचे गायक होते. अमिताभ बच्चन, गोविंदा, ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती अशा आघाडीच्या नायकांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. नव्वदच्या दशकाचा हिंदी चित्रपट संगीताचा इतिहास मोहम्मद अजीज यांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण असेल. त्यांनी प्रामुख्याने बॉलिवूड, ओडिया चित्रपटांसाठी, बंगालीसाठी गायले. त्यांनी सुमारे वीस हजार गाणी गायली, ज्यात दहापेक्षा जास्त वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये भजन (हिंदी, ओडिया आणि बंगाली), सुफी भक्तीगीते आणि इतर शैलींचा समावेश होता.
कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. श्री. विलास जावळे यांचे सोबत रॉयलचे इतर गायक यांनी त्यांना साथ संगत केली.
रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विलास जावळे आणि इतर गायक कलाकारांचे भरभरून कौतुक करीत प्रोत्साहन दिले.

