पोप फ्रान्सिस यांचे निधन
व्हॅटिकन सिटी
पोप फ्रान्सिस यांचे कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले ते 88 वर्षांचे होते.कार्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची 2013 मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांना पोप फ्रान्सिस म्हटलं जातं. पोपपदी येणारे युरोपबाहेरचे ते पहिले व्यक्ती होते.पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथलिक चर्चचं नेतृत्व करणारे पहिले लॅटिन अमेरिकन आणि पहिले जेसुइट होते.
पोपपदाच्या चार वर्षांनंतर झालेल्या सर्वेक्षणात पोप फ्रान्सिस यांनी कॅथलिक आणि इतर धर्मीयांमध्येही चांगली लोकप्रियता मिळवल्याचे दिसून येते. त्यांना ट्विटरवर तब्बल 15 मिलियन्सपेक्षा जास्त फॉलोअर्स होते परंतु प्रत्येक मुद्द्यांवर थेट भाष्य करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे व्हॅटिकनमध्ये आणि बाहेरही त्यांच्या विरोधकांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली होती
जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी ब्यूनस आयर्समध्ये इटालियन वंशाच्या कुटुंबात झाला. त्यांच्या अधिकृत व्हॅटिकन चरित्रानुसार, त्यांना 1969 मध्ये जेसुइट म्हणून नियुक्त केलं गेलं. नंतर त्यांनी अर्जेंटिना आणि जर्मनीमध्ये शिक्षण घेतलं.तरुणपणी संसर्गामुळं त्यांचं एक फुफ्फुस काढावं लागलं होतं.ब्यूनस आयर्सचे आर्चबिशप (वर्ष 2005) असताना, कार्डिनल बर्गोग्लिओ हे त्यांच्या विनम्रतेसाठी आणि सामान्य लोकांशी थेट नातं जपण्यासाठी ओळखले जात.ते 1992 मध्ये बिशप झाले आणि 1998 मध्ये ब्यूनस आयर्सचे आर्चबिशप बनले. 2005 च्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांच्याकडे पोपपदाचे दावेदार म्हणून पाहिलं गेलं होतं.