“सुवर्णभूमी कंबोडिया” पुस्तकाचे प्रकाशन
सातारा
ॲड. सीमंतिनी नूलकर लिखित “सुवर्णभूमी कंबोडिया” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ सुधिंद्र सरनोबत, शिरीष चिटणीस, डॉ. मेधा क्षीरसागर,डॉ.संदीप श्रोत्री, विश्वकर्मा प्रकाशनचे संपादक संदीप तापकीर यांच्या हस्ते ब्लॅक पर्ल हॉल, हॉटेल ग्रीन फिल्ड येथे झाले.
यावेळी बोलताना श्री शिरीष चिटणीस यांनी ॲड. सीमंतिनी नुलकर यांची लेखनशैलीचे कौतुक करून त्यांचे अनुभव व्यापक असल्याचे नमूद केले.डॉ. संदीप श्रोत्री यांनी “सुवर्णभूमी कंबोडिया” पुस्तकात लेखिका ॲड. सीमंतिनी नूलकर यांनी अतिशय आटोपशीर, नेमक्या शब्दात कंबोडियाचा इतिहास, संस्कृतीचे विविध पैलू, तेथील जगप्रसिद्ध मंदिरे याबद्दल ललित शैलीत लिहिल्याचे सांगितले. डॉ मेधा क्षीरसागर यांनी कंबोडियातील,अनुभवांविषयी,कथन केले. विश्वकर्मा प्रकाशनचे संपादक संदीप तापकीर यांनी कंबोडिया विषयी पुस्तक विश्वकर्मा प्रकाशन यांना करायचेच होते व ते पुस्तक परीपूर्ण व्हावे यासाठी लेखिकेने केलेले प्रयत्न याबद्दल सांगितले. डॉ सुधीन्द्र सरनोबत यांनी कंबोडियातील अंगकोरवाट व इतर मंदिरे बांधली गेली त्या काळाच्या इतिहासाविषयी, लेखिकेसोबत केलेल्या कंबोडिया प्रवासाविषयी माहिती दिली.
या वेळी लेखिका ॲड. सीमंतिनी नूलकर “सुवर्णभूमी कंबोडिया “स्लाईड शो च्या माध्यमातून, कंबोडियाचा इतिहास, संस्कृती, अंगकोरवाट, बायोन, ता प्रोम्ह सारखी भारतीय स्थापत्यकलेचा प्रभाव असलेली प्राचीन मंदिरे,अप्रतिम शिल्पपट, कमळकला, अजब वर्तनशैली असलेली मेकाँग नदी, तरंगती गावे, भीषण नरसंहाराची स्मारके यांचे दर्शन घडवले.
प्रकाशन सोहळ्यास मदनदादा भोसले, बाबुराव शिंदे, लोकमतच्या प्रगती पाटील, कर्नल आर. डी. निकम सैनिक बँकेचे चेअरमन कॅप्टन उदाजीराव निकम, पेरेंट्स स्कुलच्या मुख्याध्यापिका स्नेहा टाकेकर, सातारा आकाशवाणीच्या सोनाली बंड,रानवाटा संस्था, उर्वीबुक क्लबचे सदस्य, सातारा शहरातील पुस्तक प्रेमी मोठ्या संख्येने उपास्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन स्वाती राऊत यांनी केले

