शुन:शेप पुस्तकास हिंदी साहित्य अकादमी कांस्य पुरस्कार


डॉ. प्रेरणा उबाळे यांचा खास समारंभात गौरव
पुणे
मुंबई येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रदान समारंभात डॉ. प्रेरणा उबाळे यांच्या “शुन:शेप” हिंदी अनुवादित काव्य संग्रहाला 2023-24 चा महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा कांस्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आशिष शेलार (मंत्री, सांस्कृतिक कार्य आणि सूचना तंत्रज्ञान), डॉ शीतलाप्रसाद दुबे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई),श्रीमती मंजू लोढ़ा, (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई ) सचिन निंबाळकर, (सह-निर्देशक तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी , मुंबई) अमरजीत मिश्र (पूर्व राज्यमंत्री ) मा. प्रोफ़ेसर सतीश यादव (सदस्य, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी , मुंबई) आणि हिंदी साहित्य जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती मंजुल लोढा आणि शीतलाप्रसाद दुबे यांच्या हस्ते पुरस्कार अर्थात शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. प्रेरणा उबाळे आणि त्यांच्या आई श्रीमती शोभा उबाळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
डॉ. प्रेरणा यांचा अनुवाद क्षेत्रामध्ये प्रवेश हा साधारणपणे तेरा-चौदा वर्षांपूर्वी झाला. सुरुवातीच्या काळात बरेचसे प्रयोजनमूलक हिंदी, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास अशा विविध विषयांचे अनुवाद आणि मग साहित्याचा अनुवाद असा अनुवादाच्या क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. लहानपणापासून साहित्याची गोडी आणि सुदैवाने शाळेत, महाविद्यालयात, पुणे विद्यापीठामध्ये शिकत असताना साहित्याशी नेहमीच जवळचे नाते निर्माण होत गेले तसे वातावरणही मिळत गेले. पुणे विद्यापीठामध्ये अनुवाद पदविका केल्यानंतर अनुवाद करण्याचा छंदच जडला. मग हिंदी-मराठी परस्पर भाषांमध्ये अनुवाद करणे सुरूच राहिले. मंगलेश डबराल, विष्णू खरे, केदारनाथ अग्रवाल, केदारनाथ सिंह, अरुण प्रधान, रमणिका गुप्ता, मेघराज मेश्राम, रवींद्र लाखे, दामोदर मोरे, वामनदादा कर्डक, कर्मानंद आर्य, मेघराज मेश्राम इतरही कवींच्या कविता विविध पत्रिकांसाठी अनुवादित केल्या. काही पत्रिकांसाठी, पुस्तकांसाठी विविध विषयांवरील लेख आणि काही महत्वाची पूर्ण पुस्तके अनुवादित केली. त्यातील काही पुस्तके लवकरच प्रकाशित होतील…. या सुमारास मराठीतील श्रेष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांच्या काही कविता त्यांच्या वाचनात आल्या. समृद्धी, काळा राजकुमार, एम्टी बुकशेल्फ, टाळ्या वाजवल्यानंतर होणारे फायदे, प्रेम इत्यादी कवितांचे हिंदी अनुवाद डहाके सरांना पाठवले आणि ते त्यांना अत्यंत आवडले. त्यांनी आणखी काही कविता डॉ. प्रेरणा उबाळे यांना अनुवाद करण्यासाठी पाठवल्या. त्यांचेदेखील अनुवाद त्यांना खूप आवडले. योगायोगाने मनोज पाठक, वर्णमुद्रा प्रकाशन यांच्याकडून शुनःशेपच्या अनुवादाचा प्रस्ताव आला आणि मग तो त्यांनी लगेचच स्वीकारला.
शुनःशेपच्या अनुवादापूर्वी वसंत आबाजी डहाके यांचे काही समीक्षात्मक साहित्य वाचनात आले होते. भाषेविषयी, कवितेविषयी त्यांचे विश्लेषण मला नेहमीच माझ्या वैयक्तिक लेखन-वाचनात पुढे घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शकच ठरले होते. त्यामुळे आवडत्या कवीचे साहित्य अनुवादित करण्याची संधी मिळणे महत्वाचे ठरले.असे
डॉ. प्रेरणा उबाळे म्हणाल्या,मूळ शुनःशेपचे अबाधित, सर्जनशील आणि आजचे त्याचे नष्ट झालेले अस्तित्व हे तीव्रपणे कवितांमधून जाणवते. वर्तमान काळातील कठोर आर्थिक गणिते बाळगणाऱ्या शक्तिशाली व्यवस्थेविरुद्ध मनुष्य यांच्या संबंधाचा उलगडा करणारा काव्यसंग्रह म्हणजेच शुनःशेप होय.आजच्या संस्कृतीची वास्तविकता, समस्या, आयुष्याप्रती अपेक्षा भंग, राजकीय क्षोभ, सत्ताधारी पक्षांचे चुकीचे निर्णय, विविध प्रश्न यांमुळे निराश झालेल्या शुनःशेपरुपी माणसाचे सजीव चित्रण या काव्यसंग्रहामधून होते. सध्याच्या जीवनातील प्रश्न उभे करणे या महत्वाच्या उद्देशाने शुनःशेप कविता संग्रहाचे सृजन झाले आहे. हे सर्व कवितांमध्ये स्पष्ट किंवा अभिधात्मक पद्धतीने नाही तर अधिकांशतः सांकेतिक आणि प्रतीकात्मक पद्धतीने झाले आहे. याचबरोबर कविता संग्रहामध्ये सामान्य माणसाच्या तरल संवेदना आणि कोमल प्रेम भावना देखील काही कवितांमधून अभिव्यक्त झाली आहे. शुनःशेपमधील काही कवितांचा अनुवाद केल्यानंतर काही संदर्भाची चर्चा खुद्द डहाके सरांशी आणि प्रभा गणोरकर मैडम यांनी काव्यसंग्रहातील अनेक कवितांच्या निर्मितीचे सप्रसंग केलेले विश्लेषण माझ्यासाठी महत्वाचे ठरले. आयुष्यात प्रथमतः डहाके आणि प्रभा गणोरकर यांची झालेली सखोल साहित्यिक चर्चा, विश्लेषण यांमुळे अनुवादाकडे आणखी वेगळ्या पद्धतीने पाहण्याची दृष्टी विकसित झाली.शुनःशेपच्या निमित्ताने श्रेष्ठ कवि वसंत आबाजी डहाके यांच्या संपूर्ण मराठी काव्यसंग्रहाचा हिंदीमध्ये सर्वप्रथम अनुवाद करण्याचे कार्य माझ्या हातून घडले याबाबत मला अत्यंत आनंद होत आहे. मूळ कविने अनुवाद समतुल्य झाल्याची प्रतिक्रिया देणे, हे अनुवादकासाठी खूप महत्त्वाचे असते
वसंत डहाके यांनी अनुवादाच्या प्रकाशनाच्या समारंभात म्हणाले होते की “अनूदित कविता मूळ हिंदीच वाटत आहेत. “अशाच भावना मराठी आणि हिंदी साहित्य जगातील अनेक विद्वानांनी व्यक्त केली होती. विविध स्तरांमधून मधून यातील अनुवादित कवितांच्या विडियोना सोशल मीडियावर देखील वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पुस्तक महोत्सवात सुद्धा या अनुवादाची दखल वाचकांनी घेतली. “ असे डॉ प्रेरणा उबाळे म्हणाल्या.
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने योग्य न्याय करीत पुरस्कृत केले अशी भावना प्रेरणा उबाळे यांनी व्यक्त केली आहे. अत्यंत आव्हानात्मक रचनेच्या अनुवादासाठी सार्थक पोच पावती म्हणजे मिळालेला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार. या अनुवादाच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी भाषांचे सेतु म्हणून कार्य घडल्याचे समाधान तर आहेच. सर्वांच्या प्रेमामुळे आनंद द्विगुणित झाला. पुनः एकदा डहाके सर, प्रभा मॅडम, आई-बाबा, गुरुजन, मनोज पाठक सर, वर्णमुद्रा, शिल्पायन प्रकाशन, कपिल भारद्वाज सर, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी , प्रोग्रेसिव एज्युकेशन सोसायटीचे व मॉडर्न महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, शकुंत विहार फॅमिली, हिंदी विभागातील सहकारी, मित्र मैत्रिणी, सर्वांचे मनःपूर्वक आभार त्यांनी मानले

Advertisement

फोटो ओळ
डावीकडून शीतलाप्रसाद दुबे,सत्कार स्वीकारताना डॉ प्रेरणा उबाळे,मंजू लोढा, श्रीमती शोभा विलास उबाळे, विमल मिश्र


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!