राज नर्गिस जोडीने अजरामर गाणी दिली
दीपलक्ष्मी सभागृहात राजकपूर नर्गिस हिट्स कार्यक्रम सादर
सातारा
हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडी असलेल्या राज कपूर आणि नर्गिस यांनी रसिकांना अजरामर गाणी दिली.आज इतक्या वर्षानंतरही त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी ऐकली आणि पाहिली जातात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि हार्मनी ग्रुप यांच्यातर्फे राज कपूर नर्गिस हिट्स हा गाण्याचा विशेष कार्यक्रम दीपलक्ष्मी सभागृहात सादर करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संगीत तज्ञ अनिल वाळिंबे, शिरीष चिटणीस, मुकुंद पांडे, रविंद्र शिवदे प्रसाद चाफेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते
यावेळी मुकुंद फडके पुढे म्हणाले राज कपूर आणि नर्गिस यांची गाणी जशा अजरामर होती तशी त्यांची प्रेम कहाणी सुद्धा चर्चेत होती. राज कपूर यांचे प्रेम व्यवहारी होते, पण नर्गिसने मात्र मनापासून प्रेम केले. राज कपूरने नर्गीसला पत्नीपदाचा दर्जा मात्र दिला नाही याची खंत नर्गिसला शेवटपर्यंत जाणवत होती.
मुकुंद फडके यांनी राज कपूर आणि नर्गिस यांच्या आयुष्यातील विविध घटनांवर प्रकाश टाकताना राज कपूर नेहमीच आपल्या चित्रपटातील नायिकांच्या प्रेमात पडायचा, पण त्याने कधीच त्याचा परिणाम आपल्या संसारावर होऊन दिला नाही.आपले वैयक्तिक आयुष्य आणि आपले व्यावसायिक आयुष्य त्यांना नेहमीच वेगळे ठेवले अशी माहिती त्यांनी दिली.
नर्गिसवर खरे प्रेम सुनील दत्त यांनी केले आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत ते नर्गिस सोबत राहिले असेही त्यांनी सांगितले
साताऱ्याचे चित्रकार,लेखक,वक्ते रवींद्र शिवदे यांचा त्यांना पुणे येथील ‘महाकवी कालीदास प्रतिष्ठान’ चा लक्षवेधी पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. शिवदे यांनी राज कपूर आणि नर्गीस यांच्या काही आठवणींना उजाळा दिला.रविंद्र शिवदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की राज कपूरआणि नर्गिस यांच्या सहज, सच्च्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात कायमच अढळ स्थान निर्माण केले. “आग”, “बरसात”, “आवारा”, “श्री 420” अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी निर्माण केलेली प्रेमकथा आजही लोकांच्या मनात ताजीतवानी आहे.’आवारा हूँ’ – हे गीत आजही जगभरात ऐकायला मिळते आणि थेट 1950 च्या काळात घेऊन जाते. तसेच ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ मधील पावसात चिंब भिजलेला सीन, नर्गिसने थोड्या संकोचाने का होईना, राज कपूरच्या प्रेरणेने स्वीकारल्याची आठवण रविंद्र शिवदे यांनी सांगितली.”श्री 420” च्या सेटवर राज कपूरने नर्गिसचा गॉगल लपवून केलेली गमतीशीर शरारतही रसिकांना आवडली.नर्गिसने एका मुलाखतीत नमूद केले होते की, “राजसाहेबांनी मला फक्त हिरॉइन बनविले नाही, तर स्वप्नातल्या नायिकेला पडद्यावर जगायला शिकविले ”.
या कार्यक्रमात श्री. रविंद्र शिवदे यांनी सांगितले की, त्या काळात लोक म्हणत — “पोस्टरवर राज आणि नर्गिस दिसले की, प्रेम शिकायला थिएटरला जायचे ”. इतके प्रेक्षकांचे नाते – या जोडीशी घट्ट होते.
शिरिष चिटणीस यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला

