भगवान परशुराम समजून घेताना


वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला भगवान विष्णूंनी भगवान परशुराम म्हणून सहावा अवतार घेतला. त्यामुळे अक्षय्य तृतीयेसोबतच परशुराम जयंतीही साजरी केली जाते.भगवान परशुराम हे ब्राह्मण होते पण त्यांच्यात क्षत्रियाचे गुण होते.
जमदग्नी ऋषीं आणि रेणुका यांच्या पाच मुलांपैकी परशुराम हे चौथे होते. परशुराम हे शिवाचे परम भक्त होते. त्याला न्यायाची देवताही म्हटले जायचे. धार्मिक मान्यता आणि हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, भगवान विष्णूने पृथ्वीवरील राजाने केलेले अन्याय, अधर्म आणि पापी कृत्ये नष्ट करण्यासाठी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला. हिंदू मान्यतेनुसार, भगवान परशुराम सात चिरंजीवी पुरुषांपैकी एक आहेत आणि कलियुगात आजही पृथ्वीवर आहेत. श्रीविष्णूंचा हा एकच अवतार असा आहे, जो चिरंजीव आहे, असे सांगितले जाते.भगवान परशुरामाचे जन्माचे नाव राम होते. त्यांनी आपल्या कठोर तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले. त्यानंतर भगवान शिवाने त्यांना अनेक अस्त्रे आणि शस्त्रे दिली. ज्यात परशु हा देखील मुख्य आहे. त्यांनी परशु धारण केले, त्यानंतर त्यांना परशुराम म्हटले जाऊ लागले. परशुरामाशिवाय ते रामभद्र, भार्गव, भृगुवंशी इत्यादी नावांनी देखील ओळखले जातात.

१ अनेक शिष्य
भगवान परशुरामांनी अनेकांना शिकवले आहे. त्यांच्या शिष्यांमध्ये भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कर्ण यांसारखे योद्धे आहेत.

२ गणेशाशी युद्ध
परशुराम जेव्हा शिवाला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले गणेश पुराणानुसार, महादेवाचे निस्सीम भक्त असलेले परशुराम कैलास पर्वतावर शिवनाथांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. मात्र, प्रथमेश गणपतीने त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले. शिवशंकरांचे दर्शन घेण्यासाठी गणपती अडवत असल्याचे परशुरामांना खटकले. विनंती करूनही गणेश भगवंतांचे दर्शन घेण्यापासून रोखत आहेत म्हटल्यावर परशुरामांनी गणाधीशाला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये मोठे युद्ध झाले. त्यात परशुरामांनी परशूने गणरायावर जोरदार प्रहार केला. त्यातच लंबोदराचा एक दात निखळला. तेव्हापासून पार्वतीनंदन एकदंत नावाने ओळखले जाऊ लागले.


३ जन्मस्थळ
इंदूर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ आहे. साडेसात नद्या आणि पर्वतरांगेत वसलेल्या जानापाव ठिकाणाशी भगवान परशुराम यांच्या आयुष्यातील विविध घटना निगडित आहेत. महर्षीं जमदग्नी यांची तपोभूमी तसेच भगवान परशुराम यांचे जन्मस्थळ जानापाव, इंदूरच्या महू तहसील क्षेत्रामध्ये हसलपूर गावात स्थित आहे. जानापाव येथे जन्म घेतल्यानंतर भगवान परशुराम विद्या ग्रहण करण्यासाठी कैलास पर्वतावर गेले होते.
जानापाव पर्वतरांगेतून साडेसात नद्यांचा उगम होतो. यामधील काही नद्या यमुना तर काही नर्मदा नदीला मिळतात.येथून चंबळ, गंभीर, अंग्रेड आणि सुमारीया नावाचा नद्या तसेच साडेतीन नद्या बिरम, चोरले, कारम आणि निकेडेश्वरी यांचा उगम होतो.या नद्या जवळपास 740 किलोमीटर वाहून शेवटी यमुना तसेच साडेतीन नद्या नर्मदा नदीमध्ये जाऊन मिसळतात.

४ अनेक मान्यता
संशोधक शिवकुमार सिंह कौशिके यांच्या मते परशुरामांचा जन्म सध्याच्या बलियाच्या खैराडीह येथे झाला. दुसऱ्या एका मान्यतेनुसार मध्य प्रदेशातील इंदूरजवळ महूपासून काही अंतरावर असलेल्या जानपावच्या टेकडीवर भगवान परशुरामांचा जन्म झाला. तिसऱ्या मान्यतेनुसार त्यांचा जन्म छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील घनदाट जंगलात वसलेल्या कलचा गावात झाला. चौथ्या मान्यतेनुसार उत्तर प्रदेशातील जलालाबाद, शाहजहांपूर येथील जमदग्नी आश्रमापासून पूर्वेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर हजारो वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष सापडतात, जे भगवान परशुरामांचे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते.
परशुराम यांना त्यांचे आजोबा रिचिक, वडील जमदग्नी आणि त्यांचे मामा राजर्षी विश्वामित्र आणि भगवान शंकर यांच्याकडून धर्मग्रंथांची शिकवण मिळाली. परशुराम योग, वेद आणि नीतीमध्ये पारंगत होते. ब्रह्मास्त्रासह विविध दैवी शस्त्रे चालवण्यातही ते निपुण होते. महर्षी विश्वामित्र आणि रिचिक यांच्या आश्रमात त्यांनी शिक्षण घेतले.

५ ओणम’ हा सण
भगवान परशुरामजींनी यज्ञ करण्यासाठी बत्तीस हात उंच सोन्याची वेदी बनवली होती आणि त्यात शेकडो यज्ञ केले होते. नंतर ही वेदी महर्षी कश्यप यांनी घेतली आणि परशुरामांना पृथ्वी सोडण्यास सांगितले. तेव्हा परशुरामजींनी त्याची आज्ञा पाळली आणि समुद्र परत घेऊन गिरिश्रेष्ठ महेंद्राकडे गेले.मान्यतेनुसार परशुरामजींनी ही जमीन हैययवंशी क्षत्रियांकडून जिंकल्यानंतर दान केली होती. राहायला जागा उरली नाही तेव्हा ते सह्याद्री पर्वताच्या गुहेत बसून वरुणदेवाची तपश्चर्या करू लागले. वरुण देवाने परशुरामांना दर्शन दिले आणि सांगितले की तू समुद्रात कुऱ्हाड टाक. तुझी कुऱ्हाड समुद्रात पडेल तितके समुद्राचे पाणी सुकून पृथ्वी होईल. ती सर्व पृथ्वी तुझी होईल. परशुरामांनी हे केल्यावर समुद्राचे पाणी आटले आणि त्यांना समुद्रात सापडलेल्या जमिनीला आजचे केरळ म्हणतात. याच भूमीवर परशुरामजींनी भगवान विष्णूचे मंदिर बांधले. तेच मंदिर आजही ‘तिरूक्ककर अप्पण’ या नावाने प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. ज्या दिवशी परशुरामजींनी मंदिरात मूर्तीची स्थापना केली त्या दिवशी ‘ओणम’ हा सण साजरा केला जातो.

 


६ पहिले कावडी
कावड आणून भोलेनाथांचा अभिषेक करण्याची पद्धत नेमकी केव्हा आणि कुठून सुरू झाली हे सांगणे कठीण आहे. परंतु भगवान परशुराम हे पहिले कावडी होते ज्यांनी गंगेच्या पाण्याने शिवाचा जलाभिषेक केला असे निश्चितपणे म्हणता येईल. परशुरामांनी वडिलांची आज्ञा मानून कजरी वनात शिवलिंगाची स्थापना केली. तेथे असताना त्यांनी गंगाजल आणून त्याचा महाभिषेक केला. या ठिकाणी आजही प्राचीन मंदिर अस्तित्वात आहे. कजरी वनक्षेत्र मेरठजवळ आहे. ज्या ठिकाणी परशुरामांनी शिवलिंगाची स्थापना करून जलाभिषेक केला होता. त्या जागेला ‘पुरा महादेव’ म्हणतात

७ चिरंजीवी
भगवान परशुरामांना चिरंजीवी म्हणतात, ते आजही जिवंत आहेत. रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये त्यांचे वर्णन आहे. त्यांनी श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र उपलब्ध करून दिले होते आणि महाभारत काळात भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना शस्त्रांचे ज्ञान दिले होते. कलियुगाच्या शेवटी जेव्हा विष्णूचा कल्की अवतार जन्माला येईल, तेव्हाही परशुराम येणार असल्याचं म्हटलं जातं.

Advertisement

८ उपास्यदेवता
श्रीविष्णूचा सहावे अवतार परशुराम उपास्यदेवता म्हणून पुजले जातात. परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात परशुरामाचा जन्म झाला. वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी परशुराम जयंती उत्सव म्हणून साजरी केली जाते. परशुरामांच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही. भगवान परशुराम हे शत्रूचे निर्दालन करण्यासाठी ब्राह्म आणि क्षात्र या दोन्ही तेजांचा उत्कृष्ट उपयोग करणारे श्रेष्ठतम योद्ध्याचे उत्तम उदाहरण आहे.
अश्वत्थामा, बळी, महर्षि व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत. परशुरामाने काळावर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे तो सप्तचिरंजीवांपैकी एक आहे.
९ एकट्याने लढण्याचे अपूर्व सामर्थ्य
भगवान परशुरामाने एकट्याने संपूर्ण पृथ्वीला २१ वेळा प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर माजलेल्या अहंकारी आणि अधर्मी क्षत्रियांचा निःपात केला. अशा प्रकारे पृथ्वी प्रदक्षिणा घालून त्याने पृथ्वीचा भार हलका केला आणि त्याचसमवेत पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचे परम पुण्यही प्राप्त केले. सहस्रो क्षत्रिय आणि लक्षावधी सैन्य यांच्याशी एकट्याने लढण्याचे अपूर्व सामर्थ्य असणे – प्रजेचा छळ करून संपूर्ण पृथ्वीवर उपद्रव माजवणाऱ्या क्षत्रियांची संख्या सहस्रो होती. त्यांच्याजवळ लक्षावधी अक्षौहिणी सैन्यबळ होते. भगवान परशुराम हा नरदेह धारण केलेला साक्षात् श्रीमन्नारायणच होता. त्यामुळे त्याच्यात सहस्रो क्षत्रिय आणि लक्षावधी सैन्य यांच्याशी एकट्याने लढण्याचे अपूर्व सामर्थ्य होते.
१० दानशूर
एकछत्र सम्राटाप्रमाणे अखिल भूमीचा अधिपती असूनही अश्वमेध यज्ञाच्या वेळी परशुरामाने यज्ञाचे अध्वर्यू महर्षि कश्यप यांना संपूर्ण पृथ्वीचे दान दिले. यावरून परशुराम किती दानशूर होता, हे दिसून येते.
११ नवसृष्टीची निर्मिती करणे
भगवान परशुरामाने अवघ्या तीन पावलांत समुद्र मागे हटवून क्षणार्धात परशुराम भूमीची निर्मिती केली आणि चितेतून चित्तपावन ब्राह्मणांची निर्मिती करून परशुराम क्षेत्रात नवीन सृष्टीच साकार केली. क्षेत्रपाल देवतांची स्थाने प्रस्थापित करणे – परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपाल देवतांची स्थाने प्रस्थापित केली.एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते.


१२ रिक्लेमेशनचा निर्माता
कोकण भूमी ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमी आहे. प्रत्यक्षात गुजरातपासून केरळपर्यंत परशुराम निर्मित भूमी आहे. कोकणला ‘देवभूमी’ मानण्यात येते.
असं म्हणतात की, कोकणाच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामाने समुद्र ४०० योजने मागे हटवून केली आहे. म्हणूनच परशुरामाला सप्त कोकणाचा देव म्हणतात. संपूर्ण भारतात समुद्रालगतच्या राज्यांमध्ये परशुरामाची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते. त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत.
आज अनेक ठिकाणी समुद्र हटवून बांधकामं होतात आणि त्याला आपण ‘रिक्लेमेशन’ म्हणतो. याच परिभाषेत बोलायचं झालं तर रिक्लेमेशनचा निर्माता म्हणून भगवान परशुरामांकडेच पाहावं लागतं. त्यांनी समुद्र हटवून कोकण प्रदेश निर्माण केला. येथील भूमी लागवडीयोग्य बनवली. म्हणूनच शेतीमधले क्रांतिकारक संशोधनही त्यांनीच केल्याचे मानता येईल. परशुरामांच्या काळात यज्ञाला प्रतिष्ठा मिळाली. यज्ञ म्हणजे अग्निपूजा. म्हणूनच अग्नीचे आद्य संशोधक म्हणूनही त्यांच्याकडेच पाहिलं जातं. त्यांनीच येथील शेतीला आकार दिला. हजारो वर्ष समुद्राच्या अंमलाखाली असलेल्या या जमिनीचा खारपणा कसा घालवायचा? जमिनीचा पोत कसा सुधारायचा? याचे धडे येथील जनतेला दिले. या प्रदेशाला सधनता बहाल केली. परशुरामाने निर्माण केलेल्या या लाल मातीची ख्याती सर्वदूर झाली

१३ महिंद्र पर्वत
कोकण भूमीतील महिंद्र पर्वतावर परशुरामांनी आपली तपश्चर्या केली. हा महिंद्र पर्वत म्हणजे आताचे चिपळूण तालुक्यातील परशुराम मंदिर जेथे आहे, तो परिसर असल्याचे मानले जाते. परशुराम चिरंजीव आहेत त्यामुळे ते रोज सकाळी तीर्थयात्रेला जातात आणि संध्याकाळी या ठिकाणी परत येतात अशी समजूत आहे. परशुराम यांच्याबद्दल ब्रिटिश अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यांमधून थोडी वेगळी माहिती पुढे येते.एकेकाळी या भागामध्ये नाग वंशीयांची दाट वस्ती होती. मात्र जंगलातील हिंस्त्र श्वापदे आणि समुद्राच्या अजस्त्र लाटा यामुळे हा समाज भयभीत होता. सततच्या या भीतीमुळे त्यांनी देवाचा धावा सुरू केला. त्यांची हाक ऐकून भगवान परशुरामांनी त्यांना अभय दिलं आणि त्यांच्यासाठी कायम इथेच वास्तव्य केलं, असे क्रॉफर्ड नावाच्या एका ब्रिटिश गव्हर्नरने आपल्या ‘लिजेंड्स ऑफ कोकण’ या पुस्तकात नमूद केले आहे.

१४ क्षेत्र परशुराम
चिपळूण तालुक्यातील क्षेत्र परशुराम चिपळूणपासून १० कि.मी. अंतरावर आहे. या मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिल्याचे संदर्भ आढळतात. हे मंदिर ३०० वर्षापूर्वीचं आहे. मंदिरात काळ, काम आणि परशुराम अशा तीन मूर्ती आहेत. देवळातच बाहेरच्या बाजूला हनुमान मंदिर आहे. हा मारुती दक्षिणाभिमुख आहे. समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात दक्षिणाभिमुख मारुतीची स्थापना केली. समर्थ रामदासांनीच या मारुतीची स्थापना केली असावी. मंदिराच्या प्राकारात परशुरामांची आई देवी रेणुकामातेचे मंदिर आहे. तेथे पूर्वी जाखमातेचे मंदिर होते. हे सुंदर मंदिर साडेतीनशे वर्षांपूर्वी मंदिराच्या प्राकाराजवळच तलावाजवळ बांधण्यात आले. मंदिराच्या प्राकारातच गणपतीचे छोटे मंदिर आहे.श्रीक्षेत्र परशुराम हे शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेले महेंद्र पर्वतावरील तीर्थक्षेत्र आहे. परशुराम येथील भगवान परशुरामांचे मंदिर इ. स. ५७० मध्ये बांधण्यात आले, चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इ. स. ५७० मध्ये चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण शहर वसविले गेले.

१५ बुरोंडी गावी परशुरामांचे स्मारक
महाराष्ट्रात कोकण भागात दापोली तालुक्यातील बुरोंडी गावी परशुरामांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पुण्यातील मॉडर्न ऑप्टिशियनचे अनिल गानू आणि अश्विनी गानू यांनी हे स्मारक निर्माण केले आहे.दापोली तालुक्यात आडे या गावी पेशवेकालीन मंदिर आहे, येथे रेणुकामाता, परशुराम, रामेश्वर, गणपती, वेताळ, मारुती, शनी अशी सात मंदिरे आहेत.माहूर गडावर, श्री रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे परशुरामाचे एक प्राचीन मंदिर आहे.
उत्तर प्रदेशातील गढवालमधील जौनपूर बावर येथे ४०० वर्षे जुने परशुराम मंदिर आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!