संकटांना सामोरे जाण्यास महिला नेहमीच सिद्ध
अखिल ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर यांचे प्रतिपादन
सातारा
सर्वसाधारणपणे महिलांचे वर्णन अबला असे चुकीच्या पद्धतीने केले जात असले तरी कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी महिला नेहमीच सिद्ध असतात आणि जिद्दीने त्या संकटावर मात करतात असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर यांनी केले
अखिल ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित ब्राह्मण गौरव नारी शक्ती सन्मान पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका वैशाली भट उपस्थित होत्या व्यासपीठावर अखिल ब्राह्मण महासंघाच्या महिला संचालक सायली मुतालिक शलाका शेवडे आणि व्याख्यात्या सुवर्णा देशपांडे उपस्थित होत्या
या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला
डॉ ज्योत्स्ना कोल्हटकर पुढे म्हणाल्या,स्वतःचा संसार सांभाळत महिला संपूर्ण क्षमतेने संकटाचा आणि आव्हानांचा मुकाबला करत असते अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर दिसतात या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या या कर्तृत्वाचा गौरव केला जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे
यावेळी प्रमुख पाहुण्या वैशाली भट,अध्यक्ष ज्योत्स्ना कोल्हटकर यांच्या हस्ते विक्रमवीर गिर्यारोहक धैर्या विनोद कुलकर्णी, कायदेशीर सल्लागार ऍड ज्योती दिवाकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर माधवी जोग, सेंद्रिय शेतकरी अनुश्री फडके आणि आर्थिक सल्लागार अनन्या कुलकर्णी यांचा मानपत्र, ग्रंथ आणि झाडाचे रोप देऊन ब्राह्मण गौरव नारी शक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
प्रमुख पाहुण्या वैशाली भट यांनी महिलांच्या कार्याचा गौरव करताना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही अनुभवही सांगितले समस्यांवर मात करण्यासाठी संघटन महत्त्वाचे असल्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला
सुवर्णा देशपांडे यांनी यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्या जीवन चरित्रातील काही वेगळ्या पैलूंची माहिती श्रोत्यांना दिली
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी केले त्यांनी महासंघाच्या कार्याची माहिती दिली. संचालक सायली मुतालिक यांनी प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष यांची ओळख करून देतानाच सर्व सत्कारमूर्तींच्या मानपत्राचे वाचन केले सत्कारमूर्तींनी आपल्या मनोगतामध्ये अखिल ब्राह्मण महासंघाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि अधिक चांगले काम करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाल्याचे स्पष्ट केले
राजवाडा येथील महिला मंडळ सभागृहात झालेला या कार्यक्रमाला अखिल ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि मार्गदर्शक वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी ,सचिव भास्कर मेहेंदळे, खजिनदार महेश कुलकर्णी, संचालक शशिकांत पंडि, राजदीप माजगावकर, प्रशांत इनामदार ,संजय देसाई नितीन जोशी, वि ना लांडगे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सुरेश काणे आणि मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक मुकुंद फडके यांनी केले
आभार प्रदर्शन संचालक श्रीकांत वेलणकर यांनी केले
फोटो ओळ
सत्कारमूर्ती धैर्या विनोद कुलकर्णी,एडवोकेट ज्योती दिवाकर, अनुश्री फडके डॉक्टर माधवी जोग आणि अनन्या कुलकर्णी यांच्यासमवेत अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी डॉक्टर ज्योत्स्ना कोल्हटकर, वैशाली भट,सुवर्णा देशपांडे, सायली मुतालिक आणि शलाका शेवडे (छाया:कुलकर्णी फोटोज सातारा )

