वाल्मिक कराडच मास्टरमाईंड


संतोष देशमुख हत्येच्या आरोपपत्रात उल्लेख

Advertisement

बीड
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजले.या प्रकरणात वाल्मिक कराड याचा दाखल आरोपपत्रात आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. एकाप्रकारे तोच या हत्येत मास्टरमाईंड असल्याचे आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे.
सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड याचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख आहे. एकूण आरोपींत वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक एक आहे. त्यानंतर आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. आरोपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे 29 नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन घुले याच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता.
या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना सीआयडीला पाच महत्त्त्वाचे साक्षीदार सापडले आहेत. हे पाचही साक्षीदार गोपनीय आहेत. याच साक्षीदारांच्या जबाबानंतर सीआयडीने वाल्मिक कराडविरोधात सर्व पुरावे गोळा केलेले आहेत. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे.
सात तारखेला सुदर्शन घुले याने वाल्मिक कराड यास कॉल केला होता. त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन घुले याला सांगितले की, जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण कुणालाही सोडणार नाही. सुदर्शन घुले आणि कराड यांच्यात हा संवाद झाल्यानंतर घुले याने अवादा या कंपनीत परत कॉल केला आणि धमकी दिली, असेही आरोपपत्रात नमूद आहे.
यानंतर आठ तारखेला एकूण पाच साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबत होता. नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती. या भेटीत विष्णू चाटे याने घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा संदेश होता, असे सीआयडीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!