देवांचा देव महादेव
देशातील 12 ज्योतिर्लिंग मंदिरांची सचित्र माहिती
बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे त्यानिमित्ताने देशातील प्रमुख मंदिरांची सचित्र माहिती
भारतामध्ये महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आहेत. हिंदू धर्मातील पुराणात सांगण्यात आल्यानुसार भगवान शिव जिथे जिथे स्वतः प्रकट झाले त्या स्थानांवर ही ज्योतिर्लिंग स्थापण्यात आली आहेत.शिव महापुराणात या सर्व ज्योतिर्लिंगाच्या कथाही सांगण्यात आल्या आहेत. श्रीसोमनाथ, श्रीमल्लिकार्जुन, श्रीमहाकाल, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, श्रीभीमशंकर, त्र्यंबकेश्वर, श्रीकेदारनाथ, श्रीरामेश्वर, श्रीनागेश्वर, काशी विश्वनाथ, श्रीघृणेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगाची ठिकाणे आहेत.

श्रीक्षेत्र सोमनाथ
गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये वेरावळच्या जवळ सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग आहे. श्रीशंकाराचे हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून सोमनाथ याच्या अग्रस्थानी आहे. अथांग अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे सोमनाथाचे मंदिर अत्यंत आकर्षक दिसते. याठिकाणी साधारण 8-9 वाजता संध्याकाळी अप्रतिम लायटिंग शो करण्यात येतो. याठिकाणी अनेक पर्यटक भेट देतात.
जवळचे रेल्वे स्टेशन – वेरावळ
विमानतळ – केशोड
यासाठी खास अहमदाबाद ते वेरावळ येते सोमनाथ एक्सप्रेस जाते. तसंच जुनागढ, भावनगर, पोरबंदर आणि मुंबई यासारख्या शहरातून बसदेखील जातात.

श्री शैलम् मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग
भारतातील आंध्रप्रदेश राज्यातील दक्षिणेच्या भागात श्रीशैलम पर्वतावर कृष्णा नदीच्या काठी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर असून हे अत्यंत प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. दक्षिणेचा कैलाश या नावानेदेखील हे स्थळ ओळखण्यात येते. माता पार्वती अर्थात मलिका आणि भगवान शिव अर्थात अर्जुन म्हणून या मंदिराला मल्लिकार्जुन नाव देण्यात आले आहे.
जवळचे रेल्वे स्टेशन – मर्कापूर
विमानतळ – बेगमपेट
रेल्वे स्टेशन अथवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुम्हाला याठिकाणी पोहचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही याठिकाणी जाऊ शकता.

श्री महाकालेश्वर
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे स्थळ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. मध्यप्रदेशातील उज्जैनमधील हे मंदीर अत्यंत प्रसिद्ध आहे. रूद्र सागर सरोवराच्या किनारी असणारे हे मंदीर अप्रतिम असून भगवान शिव स्वतः लिंगामध्ये स्वयंभू रूपात स्थापित आहेत असा समज आहे. या मंदिरातील मूर्ती बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखली जाते. ही मूर्ती दक्षिणमुखी असल्याने त्याला असे नाव देण्यात आले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात जास्त आस्थेचे ठिकाण म्हणूनही याची ओळख आहे.
जवळचे रेल्वे स्टेशन – उज्जैन
विमानतळ – उज्जैन
रेल्वे स्टेशन अथवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुम्हाला याठिकाणी पोहचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही याठिकाणी जाऊ शकता.

ओंकारेश्वर
उज्जैनच्या महाकाल ज्योतिर्लिंगापासून केवळ दोन ते तीन तासाच्या अंतरावर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. ओंकारेश्वर हे मध्यप्रदेशात असून द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरात पोहचणे सोपे आहे. ओंकारेश्वरला जाताना अनेक लोकांचा भ्रम असतो की, केवळ मंदिराची परिक्रमा करावी लागते. पण तसे नाही. संपूर्ण ओंकार पर्वत हा परिक्रमेचा मार्ग आहे आणि ही परिक्रमा तब्बत 7 किमी इतकी आहे. त्यामुळे तुम्हाला परिक्रमा करायची असेल तर तुम्हाला सोबत पाणी अथवा फळांचा रस असे काही ना काहीतरी ठेवणे गरजेचे आहे. सदर मंदिर हे तीन वेळा बंद असते. सकाळी आरतीची वेळ 7 ते 8 असते, दुपारच्या जेवणानंतर अर्थात 12.20 ते 1.20 आणि ध्यानाची वेळ संध्याकाळी 4 ते 5 या वेळात मंदिरा बंद असते. त्यामुळे तुम्ही दर्शन घ्यायला जाताना हे नक्की लक्षात ठेवा.
जवळचे रेल्वे स्टेशन – उज्जैन
विमानतळ – उज्जैन

केदारनाथ
सर्वात सुंदर आणि अप्रतिम असे ज्योतिर्लिंगाचे स्थळ म्हणजे केदारनाथ असे म्हटले जाते. अत्यंत सुंदर निसर्ग आणि तितकेच सुंदर आणि मनाला शांतता देणारे हे मंदिर आहे. केदारनाथ मंदिर हे उत्तराखंड राज्याच्या रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये असून हिमालय पर्वताच्या गडवाल रांगांमध्ये असणाऱ्या मंदाकिनी नदीच्या किनारी बर्फाच्छादित पर्वत शिखरांच्यामध्ये वसलेले आहे. त्यामुळे इथे गेल्यानंतर अत्यंत प्रसन्न वातावरण पाहायला मिळते.
केदारनाथची यात्रा म्हणजे चारधाम यात्रा असे नेहमी आपण ऐकतो. हे मंदिर चारधामांपैकी एक असून समुद्रसपाटीपासून 3583 मीटर उंचीवर वसलेले आहे. भारतातील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध मंदिरापैकी एक मंदिर म्हणून केदारनाथ मंदिर ओळखण्यात येते. बारा ज्योतिर्लिंगापैकी केदारनाथे ज्योतिर्लिंगाचे हे मंदीर म्हणजे सर्वात उंच ठिकाणी बांधलेले आहे.हे मंदिर अत्यंत दुर्गम ठिकाणी असूनही अनेक भाविक येथे दर्शनाला जातात.
जवळचे रेल्वे स्टेशन – ऋषीकेश
विमानतळ – डेहरादून जॉली ग्रँट
रेल्वे स्टेशन अथवा विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक माध्यमांच्या मदतीने तुम्हाला याठिकाणी पोहचावे लागते. बस, टॅक्सी अथवा स्वतःच्या कारने तुम्ही याठिकाणी जाऊ शकता. दिल्लीच्या काश्मिरी गेटमधील बस स्थानकातून ऋषिकेशपर्यंत भरपूर बसेस सुटतात. ऋषिकेशमधून गौरीकुंडसाठी जाण्यासाठी भरपूर टॅक्सी आणि बसेस मिळतात.

श्रीक्षेत्र भीमाशंकर
पुणे जिल्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर असून या ज्योतिर्लिंगामधून महाराष्ट्रातील मुख्य नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते. सह्याद्रीच्या प्रमुख रांगेतील हे ठिकाण घनदाट अरण्याने वेढले असून 1984 मध्ये याची अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भीमाशंकर हे अत्यंत सुंदर ठिकाण असून भीमा नदीचा उगम पाहणे हा अविस्मरणीय आनंद आहे. हेमाडपंथी असणारे हे मंदिर सुमारे 1200-1400 वर्षांपूर्वीचे आहे. मात्र आता याचे नवे बांधकाम करण्यात आले आहे.
जवळचे रेल्वे स्टेशन – पुणे
पुण्याहून भीमाशंकरसाठी दर अर्ध्या तासाने नियमित बस सोडण्यात येतात. तसंच इथून तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सी अथवा कारही करता येते.

काशी विश्वनाथ
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सर्वात पवित्र स्थान म्हणजे काशी विश्वेश्वर. उत्तर प्रदेशातील वाराणसी शहारामध्ये हे मंदिर स्थित असून काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर हे क्रूर आणि आक्रमक अशा कुल्बउद्दीन ऐबक याने पाडले आणि तिथे मशीद उभारली. पण अकबराच्या काळात तोरडमलांनी पुन्हा एकदा या मंदिराचे पुनर्निमाण केले. पण औरंगजेबाने पुन्हा हे मंदिर पाडले. पुन्हा अहिल्याबाई होळकर यांनी त्यानंतर हे मंदिर बांधून जीर्णोद्धार केला. या शहरात साधारतः 1654 मंदिरे आहेत. त्यामुळे याला मंदिराचे शहर असेही म्हटले जाते. मात्र प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे. विश्वनाथाचे दर्शन घेण्याआधी धुंडीराज आणि ढुंढीराज विनायकाचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे.
विमानतळ – वाराणसी
जवळचे रेल्वे स्टेशन – वाराणसी जंक्शन, काशी रेल्वे स्टेशन. इथे उतरून तुम्ही स्थानिक वाहनाने मंदिरापर्यंत पोहचू शकता.

त्र्यंबकेश्वर
श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर हे नाशिकपासून 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असणाऱ्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर वसविण्यात आले आहे. अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे. हे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले असून अनेक भाविक येथे दर्शनाला येत असतात.
त्र्यंबकेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे, पुरातन काळामध्ये हे मंदिर बांधण्यात आले. मंदिराच्या चारही बाजूला चार दरवाजे आहेत. पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्य असेल तेव्हाच उघडला जातो, बाकी दिवस भक्त इतर तीन दरवाज्यांतून प्रवेश करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात. त्र्यंबकेश्वर येथे असलेल मंदिर हे काळ्या शिळेपासून बनलेलं आहे. मंदिराची रचना अप्रतिम असून आकर्षक आहे.
विमानतळ – ओझर
जवळचे रेल्वे स्टेशन – नाशिक
तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकता.

परळी वैजनाथ वैद्यनाथ
वैद्यनाथ अर्थात परळी वैजनाथ. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे स्थान बीड जिल्ह्यातील परळी येथे आहे. भारताच्या झारखंड राज्यात संथाल परगण्यातील देवघर गावातही अजून एक वैजनाथ मंदिर असून हेदेखील ज्योतिर्लिंगापैकी एक आहे अशी मान्यत आहे. परळी येथील हे मंदीर जागृत देवस्थानापैकी एक असल्याचे मानण्यात येते. देवगिरी यादवांच्या काळामध्ये श्रीकरणाधिप हेमाद्रीने हे मंदिर बांधले असे सांगण्यात येते. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगाला हात लावता येत नाही. मात्र वैद्यनाथ येथे देवाच्या पायाला अर्थात देवाला स्पर्श करून तुम्हाला दर्शन घेता येते. या मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडेही आहेत.
जवळचे रेल्वे स्टेशन – परळी आणि अंबेजोगाई
तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकता. अंबेजोगाईपासून सतत वैजनाथला जाण्याची सोय आहे. वाहने अनेक मिळतात.

नागेश्वर
नागांचा ईश्वर अर्थात नागेश्वर. गुजरातमधील द्वारका येथे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थित मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगाच्या व्युत्पत्तीची कथा आणि महात्म्य जाणून घेतल्यानंतर पाप नष्ट होतात असा समज आहे. शिव पुराणानुसार, नागेश्वर ज्योतिर्लिंग ‘द दारूकवन’ मध्ये आहे. जे भारतातील जंगलाचे प्राचीन नाव आहे. ‘द्रुकनाव’ या नावाने भारतीय महाकाव्यामध्ये याचा उल्लेख आढळतो, जसे कामकावन, द्वैतावंत, दंडकवण नागेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल शिव पुराणात दारुका नावाचा उल्लेख आहे. ज्याने शिवभक्त सुप्रिया नावाच्या एका भक्तावर आक्रमण केले आणि इतर अनेकांसह त्याच्या शहरातील दारुकावनातील समुद्रात अनेक राक्षसांच्यामध्ये फेकून दिले. सुप्रियाने इतर कैद्यांसह शिवाच्या पवित्र मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि तिला भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी राक्षसाला पराभूत केले. नंतर तेथे ज्योतिर्लिंगच्या रूपात स्थापित झाले अशी आख्यायिका सांगितली जाते.
जवळचे रेल्वे स्टेशन – बडोदा, रतलाम
तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकता.

रामेश्वरम तीर्थ
चारधामपैकी एक असणारे रामेश्वर म्हणजे अप्रतिम आणि सौंदर्याची खाण असणारे स्थळ आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे स्थळ म्हणजे कमाल समजण्यात येते. भारतात उत्तर प्रदेशात काशीला जी मान्यता आहे, तीच मान्यता दक्षिणेतील रामेश्वरमला आहे. हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरामध्ये वेढलेले सुंदर शंखाच्या आकाराचे हे मंदिर सर्वांचेच लक्ष वेधते. स्वतः रामाने शिवलिंगाची या ठिकाणी स्थापना केली आहे असे सांगण्यात येते.रामाने स्थापित केल्यामुळेच याला रामेश्वर असे नाव पडले. येथे अनेक तीर्थ आहेत.
कसे पोहचाल
विमानतळ – मदुराई, तुटीकोरीन एअरपोर्ट
जवळचे रेल्वे स्टेशन – रामेश्वरम, रामनाथपुरम, पंबन
तुम्ही स्वतःची कार अथवा बस, टॅक्सीनेही प्रवास करू शकता.

घृष्णेश्वर
घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध असणारे हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असून दौलताबादपासून साधारण 11 कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ आहे. रामायण, महाभारत, शिवपुराण, स्कंदपुराण यासारख्या ग्रंथांत घृणेश्वर ठिकाणाचे उल्लेख आढळतात. सदर मंदिराचे बांधकाम हे लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. तसंच या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.
विमानतळ – छत्रपती संभाजीनगर
जवळचे रेल्वे स्टेशन – छत्रपती संभाजीनगर
या स्टेशन्सपासून राज्य परिवहन बस अथवा खासगी टॅक्सी वा कारद्वारे तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.

