पगाराचे नियोजन कसे कराल ?
50-30-20 चा नियम पाळला तर पगार संपणार नाही
मुंबई
नोकरदार वर्गाची पगार ही एक मोठी समस्या असते.आलेल्या पगाराचे योग्य नियोजन लावणे गरजेचे आहे.त्यासाठीच खर्चाचा ताळमेळ राखण्यासाठी 50-30-20 चा नियम मदत करू शकतो. 50-30-20 चा नियम पाळला तर पगार संपणार नाही आणि बचतही होईल
50-30-20 हा नियम सर्वप्रथम अमेरिकी सीनेट तसेच टाईम मॅगझीनमध्ये प्रभावशाली 100 लोकांमध्ये स्थान मिळवणाऱ्या एलिझाबेथ वॉरेन यांनी आणला होता. या 50-30-20 नियमाअंतर्गत त्यांनी त्यांच्या पगाराचे तीन भाग केले होते. आवश्यकता, इच्छा आणि बचत असे हे तीन भाग होते. एलिझाबेथ वॉरेन यांच्या मतानुसार पगारातील 50 टक्के हिस्सा हा गरजेच्या वस्तूंवर खर्च केला पाहिजे. त्या वस्तूंशिवाय आपण जगूच शकत नाही, अशा वस्तूंवर हा 50 टक्के हिस्सा खर्च करावा, असे वॉरेन यांचे मत आहे. यामध्ये घरातील रेशन, घरभाडे, यूटिलिटी बिल, मुलांचे शिक्षण, ईएमआय, आरोग्य विमा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
त्यानंतर 50-30-20 या नियमाच्या दुसऱ्या भागात 30 टक्के खर्चाच्या नियोजनाबद्दल सांगितलेले आहे. पगारातील 30 टक्के खर्च हा तुमची इच्छा असणाऱ्या गोष्टींवर खर्च केला पाहिजे. या अशा गोष्टी आहेत, ज्यांना तुम्ही टाळू शकता, पण त्या गोष्टींसाठी पैसे खर्च केल्यावर आनंद मिळतो. यामध्ये चित्रपट पाहणे, पार्लर, शॉपिंग, बाहेर जेवायला जाणे अशा गोष्टी या 30 टक्के खर्चात येतात.
50-30-20 या नियमात शेवटचा भाग आहे तो 20 टक्के खर्चाचे नियोजन कसे करावे. एलिझाबेथ यांच्या मतानुसार पगारातील 20 टक्के भाग हा सेव्हिंगसाठी ठेवून द्यायला हवा. या पैशांचा उपयोग, निवृत्तीनंतरचे नियोजन, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, एमर्जन्सी फंड यासाठी राखून ठेवला पाहिजे.
समजा तुमचा महिन्याला येणारा पगार हा १ लाख रुपये आहे. यातील साधारण 50 टक्के भाग ५० हजार रुपये हे रेशन, वीजबील, पाणीबील, मुलांची फी, पेट्रोल अशा अत्याशक्यक, न टाळता येणाऱ्या गोष्टींवर खर्च करावेत. त्यानंतर 30 टक्के पैसे म्हणजेच ३० हजार रुपये हे फिरायला जाणे, चित्रपट पाहणे, शॉपिंग करणे, मोबाईल, टीव्ही खरेदी करणे अशा आवडीच्या, इच्छा असणाऱ्या कमांसाठी खर्च करता येतील. उर्वरीत 20 टक्के म्हणजेच २० हजार रुपये हे गुंतवणुकीसाठी जपून ठेवले पाहिजेत. यामध्ये एफडी, निवृत्तीसाठी एनपीएस, पीपीएफ, म्यूच्यूअल फंड, एसआयपी यामध्ये हे पैसे गुंतवावेत.
