यशोदाच्या कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपन्यांमध्ये निवड
सातारा :
डिजिटल तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (CSE) ही शाखा विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक संधी निर्माण करणारी शाखा म्हणून उदयास आली आहे. या पार्श्वभूमीवर यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पस (स्वायत्त), सातारा येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाने कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विभागातील विद्यार्थ्यांची टीसीएस, इन्फोसिस, टेक्नॉलॉजीज यूएई, क्यू हिल्स टेक्नॉलॉजी तसेच नेक्सोरा टेक्नॉसॉल्व्ह आयटी सर्व्हिसेस प्रा. लि. यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आणि संस्थेच्या उद्योगाभिमुख शिक्षणाचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे.
यामध्ये अथर्व अहिरे याची जागतिक कीर्तीच्या टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. अनिकेत थोरात, शिवम घोगरे आणि शशांक गाडे यांनी टेक्नॉलॉजीज यूएई या प्रतिष्ठित कंपनीत स्थान मिळविले आहे. तसेच किरण साळुंखे आणि समृद्धी शेडगे यांची इन्फोसिस लिमिटेडमध्ये निवड झाली आहे.
याशिवाय अथर्व यादव, जय इथापे, संकेत निकम, शिवम घोगरे, विशाल ठाकर, सई सुनील खोडके, रोहन अशोक करवंदे आणि वैश्नवी पाचुपते यांनी क्यू हिल्स टेक्नॉलॉजीमध्ये रोजगाराची संधी मिळवली आहे. सायली सुरेश कदम हिची *नेक्सोरा टेक्नॉसॉल्व्ह आयटी सर्व्हिसेस प्रा. लि.*मध्ये निवड झाली असून, विभागाच्या यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.
महाविद्यालयातील प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल विद्यार्थ्यांच्या यशामागील प्रमुख आधारस्तंभ ठरला आहे. तांत्रिक कौशल्य विकास, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, ॲप्टिट्यूड प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू, समूहचर्चा आणि उद्योगाभिमुख मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने कॅम्पस मुलाखतींना सामोरे जात आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सातत्यपूर्ण समन्वय साधून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात प्लेसमेंट विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), वेब डेव्हलपमेंट आणि फुल-स्टॅक प्रोग्रामिंग या क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटर सायन्स अभियंत्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यशोदा टेक्निकल कॅम्पसला प्राप्त झालेल्या स्वायत्त दर्जामुळे उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत केला जात असून, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रत्यक्ष प्रकल्प, इंटर्नशिप आणि उद्योग अनुभवाच्या माध्यमातून जागतिक स्पर्धेसाठी सक्षम केले जात आहे.
यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रा. डॉ. दशरथ सगरे म्हणाले, *”आज प्रत्येक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असून कॉम्प्युटर सायन्स पदवीधरांसाठी देश-विदेशात अमर्याद संधी उपलब्ध आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता उद्योगाभिमुख कौशल्ये, प्रत्यक्ष प्रकल्प, इंटर्नशिप आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देतो. विद्यार्थ्यांच्या या यशस्वी प्लेसमेंटमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची आमची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.”
फोटो
कॅम्पस प्लेसमेंट द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा समवेत प्रा. डॉ. दशरथ सगरे, प्रा. डॉ. अजिंक्य सगरे, कुलसचिव, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व इतर

