अदानींवर अमेरिकेत खटला
लाच आणि फसवणूक प्रकरणी कारवाई
वॉशिंग्टन
गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे.अमरिकेतील त्यांच्या एका कंपनीला काँट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी 25 कोटी डॉलरची लाच देण्याचा तसेच हे प्रकरण लपवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.बुधवारी (20 नोव्हेंबर) न्यूयॉर्कमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
गौतम अदानी 62 वर्षांचे असून त्यांचा उद्योग प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे.सध्या अदानी समूह हा बंदर विकास, विमानतळ, रस्ते, उर्जा, अक्षय उर्जा, वाहतूक, गॅस वितरण, रिअल इस्टेट, एफएमसीजी आणि आर्थिक सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे.
अलीकडेच या समूहाने माध्यम व्यवसायातही प्रवेश केला आहे.
अमेरिकेतील सरकारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी केलेल्या आरोपानुसार, अदानी आणि त्यांच्या कंपनीच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या उर्जा कंपनीला काँट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना पैसे देण्यास सहमती दर्शवली होती.या काँट्रॅक्टच्या माध्यमातून कंपनीला येणाऱ्या 20 वर्षांमध्ये दोन अब्ज डॉलरहून अधिकचा नफा होण्याची शक्यता आहे.अदानी ग्रुपने या सगळ्या आरोपांबाबत अद्याप तरी प्रतिक्रिया किंवा कोणतंही उत्तर दिलेलं नाही.
अदानी ग्रुप हा 2023 पासूनच अमेरिकेमध्ये संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याचं चित्र आहे. 2023 मध्येच हिंडनबर्ग नावाच्या एका कंपनीने अदानी ग्रुपवर मोठ्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यावेळीही अदानी ग्रुप बराच चर्चेत आला होता.त्यावेळी, अदानी ग्रुपने हिंडनबर्ग कंपनीने केलेले सगळे दावे फेटाळून लावले होते. मात्र, या ग्रुपविरोधात आलेल्या बातम्यांमुळे शेअर मार्केटमध्ये त्यांचे सगळे शेअर्स कोसळल्याचं दिसून आलं.
गेल्या काही महिन्यांपासूनच या फसवणुकीबाबत तसेच लाचखोरीच्या प्रकरणातील तपासाबाबतच्या बातम्या येत होत्या. अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी असं म्हटलं आहे की, या प्रकरणाचा तपास 2022 मध्येच सुरु करण्यात आला होता.अदानी ग्रुपवरचा मुख्य आरोप असा आहे की, त्यांच्या व्यवस्थापकांनी कर्ज आणि बॉन्ड्सच्या स्वरुपात तीन अब्ज डॉलर जमा केले होते. लाचलुचपतविरोधी धोरणांविरोधात दिशाभूल करणारी विधाने करून हा पैसा उभारण्यात आल्याचा त्यांचा मुख्य आरोप आहे.
गेल्या आठवड्यातच सोशल मीडियाच्या माध्यमातून गौतम अदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाच्या सदिच्छाही दिल्या होत्या. या सदिच्छांसोबतच अमेरिकेमध्ये 10 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणाही केली होती.

