आता मतदार राजाची जबाबदारी


राज्यात ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
मुंबई
लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष ५ कोटी २२ हजार ७३९, तर महिला मतदार ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ इतक्या आहेत, ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार असून मतदारसंख्येत पुणे जिल्हा आघाडीवर आहे.
राज्यात 4,69,96,279 महिला मतदार आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. दिव्यांग (मतदारांची एकूण संख्या 6,41,425 इतकी असून सेना दलातील मतदारांची संख्या 1,16,170 आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणूकीच्या रिंगणात एकूण ४ हजार १३६ उमेदवार आहेत. ज्यामध्ये ३,७७१ पुरूष, ३६३ महिला आणि तर अन्य २ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशा संख्येने ईव्हीएम उपलब्ध असून पुरेसा साठा आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 1,00,186 इतक्या मतदान केंद्रांसाठी 2,21,600 बॅलेट युनिट (221 %), 1,21,886 कंट्रोल युनिट (122 %) व 1,32,094 व्हीव्हीपॅट (132 %) इतक्या प्रथमस्तरीय तपासणी मशिन्स उपलब्ध असून एकूण प्रथमस्तरीय करण्यात आलेल्या ईव्हीएम पैकी प्रशिक्षण व जनजागृतीच्या कार्यक्रमाकरिता त्यापैकी 5166 बॅलेट युनिट, 5166 कंट्रोल युनिट व 5165 व्हीव्हीपॅट इतक्या मशिन्सचा वापर करण्यात आला आहे. या सर्व बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व ईव्हीएम मशिन्सची प्रथम सरमिसळ दिनांक 18 ते 21 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत सर्व जिल्ह्यांकडून करण्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण 185 विधानसभा मतदाररसंघात एक बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर 100 मतदारसंघात दोन बॅलेट युनिट आणि तीन मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट लागणार आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगामार्फत राज्यभरात 1 लाख 427 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मतदारांना सुलभतेने मतदान करता येण्यासाठी राज्यात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात 8 हजार 462 मतदान केंद्र आहेत. त्यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 579, ठाणे – 6 हजार 955, नाशिक – 4 हजार 922 तर नागपूर येथे 4 हजार 631 मतदान केंद्र आहेत.
शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आली असून सहाय्यक मतदान केंद्रांची एकूण संख्या 241 इतकी आहे.

Advertisement

४२६ मतदान केंद्र ‘महिला नियंत्रित’

केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये ३३, गोंदिया ३२ आणि सोलापूर २९, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला नियंत्रित मतदान केंद्र असतील.महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्र असणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर होणार नाही याची काळजी घेतली आहे.

जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र
अहमदनगर १२, अकोला ६, अमरावती ८, औरंगाबाद १३, बीड ८, भंडारा ८, बुलढाणा ७, चंद्रपूर ९, धुळे ५, जालना ६, कोल्हापूर १०, लातूर ६, मुंबई शहर १२, नागपूर १३, नांदेड ९, नंदुरबार ४, उस्मानाबाद ४, पालघर ६, परभणी ८, पुणे २१, रायगड ९, रत्नागिरी ६, सांगली ८, सातारा १७, ठाणे १८, वर्धा ९ आणि यवतमाळ ७ असे असणार आहेत.

मतदान केंद्रावर हे पुरावे असणार ग्राह्य
आपले नाव मतदार यादीत असेल मात्र मतदान केंद्रावर निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेले मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान केंद्रावार त्याच्याशिवाय पुढील ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. यामध्ये १) आधार कार्ड २) वाहन चालक परवाना ३) पॅन कार्ड ४) भारतीय पारपत्र ५) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ६) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र ७) संबंधित शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र ८) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मूळ प्रमाणपत्र ९) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मूळ प्रमाणपत्र १०) भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानासाठीची सर्व तयारी झालेली आहे. आता जागरूक मतदार म्हणून लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करुयात


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!