अंगणवाडी सेविका,मदतनीसांनी घेतली मतदान शपथ
कोरेगाव विधानसभा मतदारसंघअंतर्गत भिवडी येथे कार्यक्रम
कोरेगाव
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत भिवडी येथे शेकडो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मतदानाची शपथ घेतली. स्वतः मतदान करणे बरोबरच इतरांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचा निर्धार यावेळी सेविका आणि मदतनीस यांनी केला. यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी शारदा जाधव, पर्यवेक्षिका वैशाली आळतेकर उपस्थित होत्या. सुदृढ आणि बळकट लोकशाहीसाठी मतदान गरजेचे आहे. आपल्या भावी पिढीच्या उज्वल भवितव्यसाठी मतदान गरजेचे आहे,असा सूर एकंदरीत उपक्रमामध्ये उमटला. मतदान करणे हा केवळ आपला अधिकार व हक्क नसून ते पवित्र कर्तव्य आहे. 20 नोव्हेंबरला सर्वांनी मतदान करावे .इतकेच नव्हे तर आपले पाहुणे, आपले शेजारी, आपले मित्र सर्व पात्र मतदारांना मतदानाची जाणीव करून द्यावी. आठवण करून द्यावी .मतदान हे एक पवित्र देशकार्य आहे. उज्वल पिढी तेव्हाच घडेल जेव्हा मतदार लोकशाहीच्या उत्सवात आणि निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षपातीपणे सहभागी होतील. निष्पक्ष ,निर्भीड आणि प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन यावेळी पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा ग्रामीण भागात थेट संपर्क असतो. त्यामुळे मतदान जनजागृती मध्ये हे दोन्ही घटक प्रभावी भूमिका बजावू शकतात.वैशाली आळतेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले.शारदा जाधव यांनी आभार मानले.

