16 नोव्हेंबरला प्रियांका गांधी यांची कोल्हापुरात सभा


कोल्हापूर
काँग्रेसने अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस व ज्यांच्या विषयी युवा पिढीत मोठी क्रेझ आहे त्या प्रियांका गांधी यांनाच प्रचाराच्या मैदानात उतरविण्याचे नियोजन केले आहे. प्रियांका गांधी यांची 16 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे .येथील वरूणतीर्थ गांधी मैदानावर ही सभा होईल. कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात मोठे धमासान झाले. अधिकृत उमेदवार सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघारीच्या दिवशी अगदी अखेरच्या काही मिनिटात धक्कादायकरीत्या निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आधी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर झालेले व नंतर उमेदवारी नाकारण्यात आल्याने बंडखोरी केलेले कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याची वेळ काँग्रेस व महाविकास आघाडीवर आली. या घडामोडीत काँग्रेस पक्ष बॅक फुटवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर थेट प्रियांका गांधी यांनाच प्रचारासाठी मैदानात उतरवण्याचे जिल्हा काँग्रेसचे नियोजन आहे .त्यातूनच 16 नोव्हेंबर रोजी प्रियांका गांधी यांची वरूनतीर्थ गांधी मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचा मुख्यतः लाभ कोल्हापूर उत्तरमधील पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर व कोल्हापूर दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार ऋतुराज संजय पाटील यांना होऊ शकेल, असा अंदाज आहे. याआधी गांधी घराण्यातील श्रीमती इंदिरा गांधी, राजीव गांधी व सोनिया गांधी यांच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात सभा झाल्या आहेत. मात्र प्रियांका गांधी प्रथमच पक्षाच्या प्रचारासाठी कोल्हापुरात येत आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी दिसण्यात आणि बोलण्यातही प्रियांका गांधी यांचे लक्षणीय साधर्म्य आहे. त्यामुळेच राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य जनतेतही त्यांच्या सभेविषयी मोठी उत्कंठा असणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!