दीपलक्ष्मी सभागृहात लेखक तुमच्या भेटीला


लेखिका ऍड. सीमंतिनी नूलकर यांच्या साहित्यावर चर्चा
सातारा:
येथील आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा यांचे वतीने सातारा जिल्ह्यातील लेखकांच्या साहित्यावर चर्चा, करण्यासाठी” लेखक तुमच्या भेटीला” असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे . या उपक्रमातील पहिला कार्यक्रम दिपलक्ष्मी सभागृहात पार पडला .येथील प्रथितयश वकील आणि लेखिका ऍड. सीमंतिनी नूलकर यांच्या साहित्यावर चर्चा यावेळी झाली.
पश्चिम घाटापासून हिमालया पर्यंतच्या आणि देश विदेशातल्या मनमुराद भटकंतीत अनुभवलेली लोकसंस्कृतीआणि निसर्ग या अनुषंगाने वेगळ्या वाटांवरचा, वेगळ्या अनुभवांचा लेखा जोखा मांडणारे लेखन ऍड. सीमंतिनी नूलकर सातत्याने करत आल्या आहेत.त्यांची “लदाख भारताचा अद्भुत मुकुटमणी” , “बिरीस्ता” आणि ” अकथ कथा” अशी तीन ललित पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत . त्यांची ” सुवर्णभूमी कंबोडिया”, ” दुर्गध्यास” आणि ” जंगली फुलांचे प्रदेश” ही तीन पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत.
यावेळी बोलताना ऍड नूलकर यांनी त्यांच्या पश्चिम घाट,हिमालय, या प्रदेशातील जंगली प्रदेशात त्यानी केलेल्या भटकंतीत जंगली फुलांचे बहर, मान्सून, ऋतुचक्र अनुभवले, त्याचे अतिशय चित्रमय वर्णन केले . तसेच,ऍड सीमंतिनी नूलकर यांनी यावेळी कदंबाच्या फुलांच्या मिषाने आर्यभट्टाने पाचव्या शतकातच पृथ्वी बंधन म्हणजेच गुरुत्वाकर्षण सिद्धांत , कसा समजावला, सुर्यफुलातले फीबोनाची सिक्वेन्स हे इटालियन गणितीच्या नावाने ओळखले जाणारे निसर्गातले शास्त्रीय सूत्र वस्तूत: इ. पु. दुसऱ्या शतकात भारतीय गणिती पिंगला, हेमचंद्र, वामन इ. कसे वापरले आहे आणि प्राचीनभारत विज्ञानात किती प्रगत होता ते सांगितले.

Advertisement


भटकंतीत त्यांनी भारताच्या खाद्य संस्कृती विषयीचे अनुभव सांगताना कोकण पट्ट्यातली पोपटीप्रथेमागचे शास्त्र सांगितले. पोपटी करताना अन्न पदार्थ मडक्यात भांबुरड्याचा पाला वापरून शिजवतात .या पाल्याची पाण्याची वाफ धरून ठेवण्याची क्षमता जबरदस्त असते आणि त्या अंतर्गत ऊर्जेवर अन्न, तेलाचा वापर न करता कसे पूर्वापार माणूस शिजवत आला आहे ते स्पष्ट केले. कंबोडियातले अंगकोरवाट मंदिर स्थापत्याची संशोधनातून समोर आलेली वैशिष्ट्ये सांगितली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना नामवंत लेखक, दिग्दर्शक श्री योगेश्वर गंधे म्हणाले, माणूस दिवसेंदिवस निसर्गापासून दूर जात आहे,निसर्गातच ईश्वर आहे आणि त्याची प्रचिती ऍड सीमंतिनी नूलकर यांच्या लेखनातून येते.
कार्यक्रमाने प्रास्ताविक श्री शिरीष चिटणीस यांनी केले आणि उपक्रमामागची , साता-यात साहित्य चळवळ सुरू करण्यामागची भूमिका सांगितली . पुस्तकप्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी समूहाचा पहिलाच उपक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले.
. ऍड नूलकर यांचे अनुभव ,लेखन याबद्दल बोलताना साताऱ्यातील नामवंत विचारवन्त श्री किशोर बेडकिहाळ म्हणाले , की मराठी साहित्य क्षेत्रात अनुभव घेऊन त्यासाठी कष्ट घेऊन निसर्गाविषयी फारसे लेखन झालेले दिसत नाही. ऍड नूलकर यांचा निसर्ग प्रवास वर्णन असा नवा साहित्य प्रकार आहे .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रदर्शन स्वाती राऊत यांनी केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे श्री विनोद कुलकर्णी , प्रसिद्ध लेखक डॉक्टर राजेंद्र माने, विचारवंत श्री किशोर बेडकिहाळ, सोलापूर म. न. पा च्या सी. ओ. सौ विद्या पोळ, समूहाचे कार्यकारिणी सदस्य आणि सभासद मोठ्या संख्येने हजर होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!