संगीत साधना मनाला आनंद देते – श्रीराम नानल
‘सुर संगम’ संस्थेचा कराओके गीतांचा कार्यक्रम
सातारा
संगीत साधना ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून मनाला आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देणारी उपासना आहे. जुन्या हिंदी चित्रपटसंगीतातील अजरामर गीते गाण्याने मन समृद्ध होते, संवेदनशील बनते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असे प्रतिपादन हिंदी चित्रपटसंगीताचे अभ्यासक श्रीराम नानल यांनी केले.
‘सुर संगम’ या संस्थेचा कराओके गीतांचा कार्यक्रम दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या कराओके कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संगीतप्रेमी, गायक-गायिका आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्रीराम नानल म्हणाले की, जुनी हिंदी गीते ही भारतीय संगीताची अमूल्य परंपरा आहे. ही गाणी गाताना केवळ शब्द आणि चाल यांचाच विचार न करता त्या गीताचा आधार असलेला राग समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे गाण्याची सादरीकरणाची गुणवत्ता अधिक प्रभावी होते आणि संगीताची जाणही वाढते. विशेषतः उदयोन्मुख गायक-गायिकांनी शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम करण्यावर भर द्यावा.
यावेळी त्यांनी गीतकार गुलजार आणि संगीतकार आर. डी. बर्मन या अजरामर जोडीने हिंदी चित्रपटसंगीताला दिलेल्या अप्रतिम गीतांचा उल्लेख करून त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. या जोडीने भावस्पर्शी शब्द आणि नावीन्यपूर्ण संगीताच्या माध्यमातून अनेक कालातीत गाणी रसिकांना दिली, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व संगीत अभ्यासक मुकुंद फडके यांनी स्वर्गीय मुकेश आणि आशा भोसले यांच्या गायकीची वैशिष्ट्ये उलगडून सांगितली. त्यांच्या आवाजातील भावपूर्णता, अभिव्यक्ती आणि संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाचे स्मरण करून त्यांनी या दिग्गज कलाकारांना आदरांजली अर्पण केली.
प्रास्ताविकात शिरीष चिटणीस यांनी युनूस शेख आणि शाबुद्दीन शेख हे बंधू संगीत प्रसारासाठी सातत्याने करीत असलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. संगीत संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत त्यांनी ‘सुर संगम’ संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले.सुरेखा शेजवळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जुन्या हिंदी चित्रपटगीतांच्या सुरेल सादरीकरणाने अविस्मरणीय वातावरण निर्माण झाले. संगीतप्रेमींना दर्जेदार संगीताचा आनंद देतानाच नवोदित गायकांना प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरला.

