महापुरुषांची चळवळ ‘ॲक्शनपोझ’वर हवीः वामनराव म्हस्के


भाऊंचा अमृतमहोत्सवी गौरव सोहळा साताऱ्यात उत्साहात

सातारा
हल्ली लोक फार उत्सवप्रिय झालेत. महापुरुषांची जयंती अथवा तत्सम कार्यक्रम जल्लोषात करत आहेत. मात्र काहीतरी उभे करण्यासाठी रचनात्मक कार्य होताना दिसत नाही. त्यामुळे आता आंबेंडकरवादाच्या अधिष्ठानावर रचनात्मक कार्य उभारण्याची चळवळ हाती घेऊन नवनिर्माणाचे स्वप्न नव्या पिढीत रुजवावे लागेल. यासाठी ‘ॲक्शनपोझ’ घेण्याशिवाय पर्याय नाही, असे विचार आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव म्हस्के ऊर्फ भाऊ यांनी व्यक्त केले.
साताऱ्यातील अर्थात भीमाईभूमीतील विविध परिवर्तनवादी संस्था, संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वामनराव म्हस्के यांचा अमृत महोत्सव गौरव सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात संपन्न झाला. यामध्ये वामनराव म्हस्के बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी चळवळीतील विचारवंत मिनाज सय्यद होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून धम्मशिल चॕरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव कांबळे यांची उपस्थिती होती. वामनराव म्हस्के व त्यांच्या पत्नी मायाताई म्हस्के यांना पेढ्यांचा हार, शाल व पूष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यादरम्यान ‘भाऊंच्या मनातील गप्पा’ या कार्यक्रमद्वारे मुलाखतीतून म्हस्केभाऊंशी पत्रकार अरुण जावळे तसेच नारायण जावलीकर यांनी संवाद साधत गप्पांची मैहफिल फुलवली. आयुष्याच्या एकूण प्रवासतील वाटा आणि वळणे कोणती, चढ आणि उतार कोणते, प्रेरणा आणि आदर्श कोणते याचा सर्वस्पर्शी आलेख या दिलखुलास गप्पांतून उलगडला गेला. भाऊंची नात अदिती कांबळे हीने यावेळी केलेल्या भाषणाने सर्वांची मने जिंकली.

Advertisement

सोहळ्याचे अध्यक्ष मिनाज सय्यद यांनी आपल्या भाषणात महापुरुषांच्या विचारांची चळवळ पुढे न्यायची असेल तर वामनराव म्हस्के यांच्यासारख्या व्यक्तिमत्वातून आपण काहीतरी शिकले पाहिजे. पंचाहत्तरी गाठली तरी परिवर्तनाचा विस्तव स्वतःच्या अंतकरणात ते कसे तेवत ठेवत आहेत आणि निस्वार्थ, निरपेक्ष भावनेने कसे योगदान देत आहेत, हे खरेतर खूपच महत्त्वाचे आहे. नव्या पिढीने हा आदर्श जपला पाहिजे. विलासराव कांबळे यांनीही आपल्या भाषणात वामनराव म्हस्के यांच्या कार्यकर्तृत्वावर भाष्य करत म्हस्केंच्या कार्याला सदिच्छा व्यक्त केल्या. यादरम्यान सुशीलकूमार कांबळे, ॲड. दयानंद माने, प्राचार्य डॉ. अरुण गाडे, विवेक म्हस्के, जालिंदर म्हस्के आदी मान्यवरांनी आपल्या भावाना व्यक्त केल्या.

डॉ. दिलिप कांबळे, ॲड. हौसेराव धुमाळ, चंद्रकांत खंडाईत, हरिदास जाधव, दिलिप गायकवाड, धनंजय म्हस्के, विजयराव गायकवाड, रमेश इंजे, विवेक म्हस्के, प्राचार्य रमेश जाधव, योगेश म्हस्के, प्रा. रमेश म्हस्के, धनराज म्हस्के, दिलिप भोसले, शाहीर श्रीरंग रणदिवे,, तुकाराम गायकवाड, प्राचार्य संजय कांबळे, शिवाजी वायफळकर, दीपक जाधव, मच्छींद्र जाधव, शाहीर प्रकाश फरांदे आदी मानवरांसह विविध क्षेत्रातील अधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. पत्रकार अरुण जावळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर नारायण जावालीकर यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!