ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ


राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक-युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येईल. या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येईल तसेच याचे मुख्यालय पुणे येथे राहील.

राजपूत समाजासाठी महामंडळ
राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक-युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येईल. या महामंडळाला 50 कोटींचे भागभांडवल देण्यात येईल तसेच याचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे राहील.

दूध उत्पादकांना सात रुपयांचे अनुदान

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.या दूध उत्पादकांना प्रति लीटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करून ते सात रुपये देण्यात येईल. दूध उत्पादकांना दूध संघांनी ३.५ फॅट /८.५ एसएनएफ या प्रति करिता १ ऑक्टोबर २०२४ पासून २८ रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे. त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रतिलिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ३५ रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे.ही योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून राबवण्यात येईल. मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेसाठी ९६५ कोटी २४ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Advertisement

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे नामकरण

लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार नामकरणाची शिफारस केंद्र शासनास पाठवण्यात येईल. लोहगाव विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देण्याची विनंती वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली होती.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रे येथील भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

वांद्रे रिक्लमेशन येथील 2 हजार चौरस मीटरचा भूखंड हा रहाणे यांना तीस वर्षांकरिता भाडेपट्ट्याने देण्यात येईल. यापूर्वी हा भूखंड क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना इनडोअर क्रिकेट प्रक्षिशण केंद्रासाठी 1988 मध्ये वितरित करण्यात आला होता. मात्र या भूखंडावर कोणतेही काम न झाल्याने शासनाने तो परत घेतला आहे. या भूखंडाची सद्याची परिस्थिती वाईट असून, आसपासचे झोपडीधारक अनावश्यक कामांसाठी याचा वापर करत आहेत. त्यानंतर म्हाडा प्राधिकरणाने ठराव करून हा भूखंड माजी कर्णधार अजिंक मधुकर रहाणे यांना देण्याची शिफारस केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!