केजरीवाल राजीनामा देणार
जनतेच्या दरबारात जाणार असल्याची घोषणा
नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना येत्या दोन दिवसात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.आपण जनतेच्या दरबारात जाणार असून जनतेचा निर्णय येईपर्यंत खुर्चीवर बसणार नसल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. शिवाय उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया मुख्यमंत्री बनणार नाही हे सुद्धा केजरीवाल यांनी सांगितलं. केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
अरविंद केजरीवाल यांची 13 सप्टेंबरला तिहारमधून सुटका झाली. 177 दिवसांनंतर ते जेलमधून बाहेर पडले. त्यानंतर तिस-याच दिवशी रविवारी, अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांच्यासोबत आप नेते मनीष सिसोदिया, आतिशी आणि संजय सिंग उपस्थित होते.
केजरीवाल म्हणाले,मी आणि मनीष सिसेदीया जनतेच्या दरबारात जाणार मला जनतेला विचारायचंय की तुम्ही मला इमानदार मानता की गुन्हेगार मी येत्या दोन दिवसात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे.मी प्रामाणिक असल्याचं जोपर्यंत जनता निर्णय देत नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही. मनीष सिसोदिया मुख्यमंत्री बनणार नाहीत.
सुप्रीम कोर्टानं केजरीवालांना जामीन देताना सीबीआयनं केलेली अटक चुकीची नसल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणी संपल्या नसल्याचं तिथेच स्पष्ट झालं होतं. शिवाय अरविंद केजरीवाल यांना जामीन देताना अटी घातल्या आहेत.या अटींवरून हे स्पष्ट होतं की, मुख्यमंत्री असूनही अरविंद केजरीवाल यांना कोणतेही निर्णय घेण्याचे आणि हस्तक्षेप करण्याचे अधिकार राहत नाहीत. त्यामुळेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन थेट जनतेत जाण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला

