महायुतीला 177 जागांवर अनुकूल परिस्थिती


विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचा अंतर्गत सर्व्हे
मुंबई
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा हुरुप वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. महायुतीकडून आगामी निवडणुकांसाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते.विधानसभा निवडणुकांसाठी शिंदे गटाकडून करण्यात आलेला हा दुसरा सर्व्हे आहे. यामध्ये महायुतीला राज्यातील 177 जागांवर अनुकूल परिस्थिती असल्याची बाब निदर्शनास आली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला 48 जागांपैकी अवघ्या 17 जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये भाजपला नऊ, शिंदे गटाला 7 आणि अजितदादा गटाचा एका जागेवर विजय झाला होता. त्यामुळे महायुतीसाठी विधानसभा निवडणूक अवघड असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, ताज्या सर्वेक्षणाचा अहवाल पाहता महायुतीसाठी आशादायक चित्र असल्याची चिन्हं दिसत आहेत.महायुती सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा या दोन लोकप्रिय योजनांची घोषणा केली होती. यापैकी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला सरकारकडून 1500 रुपये मिळणार आहेत. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील पात्र कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला फायदा होऊ शकतो. याचाच इफेक्ट शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Advertisement

राज्यातील 177 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीसाठी अनुकूल वातावरण असले तरी बंडखोरीला लगाम घालण्याचे मुख्य आव्हान महायुतीसमोर असेल. बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी इच्छूक उमेदवारांची मनधरणी करून उमेदवार निश्चित करताना तिन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण, उमेदवारी न मिळाल्यास नाराज उमेदवार पवार गट किंवा ठाकरे गटाची वाट धरू शकतात. अशावेळी महायुतीचे नेते बंडखोरी टाळण्यासाठी काय रणनीती आखतात, हे पाहावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत भाजप आणि संघातील समन्वय व्यवस्थित नसल्याची चर्चा रंगली होती. मात्र, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संघ भाजपसाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये यांच्याकडे महाराष्ट्रात समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि संघात समन्वय पाहायला मिळाला नव्हता.याचा फटका भाजपला राज्यात बसला होता. तसा फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये यासाठी संघ आणि भाजपमध्ये महाराष्ट्रात समन्वयाची जबाबदारी अतुल लिमये यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. येत्या महिन्यातभरात संघ आणि भाजप नेत्यांच्या बैठका होणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!