विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगावे : मोहन चौबळ
सिद्धी सावंतचा पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल सत्कार
सातारा
विद्यार्थ्यांना जर यश मिळवायचे असेल तर त्यांनी नेहमीच उच्च ध्येय मनामध्ये बाळगून त्यानुसार आपली वाटचाल केली पाहिजे, जीवनामधील यशासाठी खडतर प्रयत्नांची ही गरज आहे, असे प्रतिपादन स्प्रिंग कॉम्प्युटिंग टेक्नोलॉजी पुणेचे सीईओ मोहन चौबळ यांनी केले.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या लोकमंगल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय एमआयडीसी कोडोली येथे आयोजित रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांच्या वतीने मोहन चौबळ व सोनाली चौबळ यांच्या स्प्रिंग कॉम्प्युटिंग टेक्नोलॉजी यांच्यातर्फे प्राथमिकच्या वर्गासाठी 50 बेंच देणगी रूपाने विद्यालयास दिल्याबद्दल व लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिरचि विद्यार्थिनी सिद्धी मनोहर सावंत हिची नुकतीच पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल झालेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास सोनाली चौबळ, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, संचालिका शिल्पा चिटणीस, सतीश पवार, मुख्याध्यापिका ज्योती नलवडे, विजय यादव, गुलाब पठाण,सिद्धीच्या आई शिल्पा मनोहर सावंत आदी मान्यवर उपस्थित होत
मोहन चौबळ म्हणाले, या शाळेत यायला मला नेहमीच आनंद वाटतो. या शाळेतील शिक्षक नेहमीच तळमळीने काम करत असतात. रोटरी क्लब च्या माध्यमातून आम्ही बऱ्याच शाळा साठी काम करत असतो. शाळांमध्ये वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी, शाळांचे वर्ग बांधून देण्यासाठी, बेंचेस देण्यासाठी, वॉशरूम साठी आम्ही नेहमी काम करत असतो. त्यानिमित्ताने माझे बऱ्याच शाळांमध्ये जाणे होते. परंतु या शाळेमधील शिक्षकांमध्ये जो उत्साह मला जाणवतो तो मला इतर कुठेही दिसला नाही. येथील शिक्षक अतिशय मनापासून काम करतात. विविध आंतरशालेय स्पर्धा मध्ये मुलांनी भाग घ्यावा यासाठी शिक्षकांचे कायमच प्रयत्न सुरू असतात. माझे काका चंद्रकांत चौबळ हे साताऱ्यातल्या पोलीस दलामध्ये डीवायएसपी म्हणून होते. त्यामुळे पोलिसाबद्दल मला विशेष आदर आहे. सिद्धीचे मी विशेष अभिनंदन करतो.
शिरीष चिटणीस म्हणाले, सिद्धी सावंत हि मध्यमवर्ग कुटुंबा मधील मुलगी असून ती आपल्या शाळेमध्ये असताना तिचे वर्गशिक्षक संदीप जाधव व इतरांनी तिला नेहमीच शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलांना क्लास लावावे लागतात परंतु तुम्हाला मात्र क्लास लावावे लागत नाहीत. तुमचे शिक्षक हेच तुमचे आई-वडील आहेत. तुमचे शिक्षक हेच तुमचे गुरु आहेत.आपली शाळा तुमचे विविध गुण हेरून ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न करते. पण जगायचे कशासाठी तर आपल्या आनंदासाठी. आनंदासाठी जगताना आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन रोजगार सुद्धा मिळवला पाहिजे. सिद्धीने कोणताही क्लास न लावता सेल्फ स्टडी करून हे यश संपादन केलेले आहे.
सोनाली चौबळ म्हणाल्या, चिटणीस साहेबांची विद्यार्थ्याविषयीची तळमळ आजपर्यंत मी पाहिलेली आहे. सिद्धी ची मुलाखत मी माझ्या मुलींना सांगणार आहे. माझ्या दोन मुली त्यापैकी एक इंजिनिअरिंगला आहे दुसरी मुलगी आठवीला आहे, त्या दोन्ही मुलींना मी सिद्धी सावंत हिने पीएसआय बनताना कशाप्रकारे स्ट्रगल केले याविषयी मी माझ्या मुलींना सांगणार आहे. विद्यार्थ्यांनी सिद्धीचे मनोगत ऐकून त्यापासून प्रेरणा घ्यावी.
सिद्धी सावंत म्हणाल्या, ज्या शाळेत मी शिकले त्या शाळेने आज माझा सत्कार घेतला याबद्दल मला आज खूप छान वाटते आहे. मी चौथीला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसल्यामुळे माझा एक प्रकारे आत्मविश्वास वाढला. एमपीएससी परीक्षेचा पाया तिथेच घातला गेला असे मला वाटते. शाळेमध्ये खूप ऍक्टिव्हिटी होत होत्या. अभ्यासाबरोबर आम्ही खेळ सुद्धा खेळायचो. माझा पाया छान प्रकारे रचला गेला.
यावेळी शिल्पा सावंत, ज्योती नलवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मोहटकर यांनी केले. आभार हणमंत खुडे यांनी मानले.
