शरद पवार-मुख्यमंत्र्यांची बैठक
जरांगे आणि हाकेंच्या आंदोलनावर चर्चा
मुंबई
सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यांनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंधरा मिनिटे एकत्रित चर्चा झाली आहे.
एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 15 मिनिटे चर्चा झाली आहे. या चर्चेत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी आतापर्यंत काय प्रयत्न केले, याबाबत माहिती दिली. शरद पवार यांनी याआधी सरकार मनोज जरांगे किंवा लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देत आहे याबाबत विरोधी पक्षाला काहीच माहिती नसते असे बोलून दाखवले होते. त्यानंतर आता शिंदे यांनी सरकारने मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत काय काय केले आहे, याची माहिती शरद पवार यांना दिली आहे. या भेटीनंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी 9 जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. विरोधी पक्षाने मात्र या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सरकार आंदोलकांना काय उत्तरं देतंय, काय आश्वासनं देतंय अशी भूमिका घेतली होती. या बैठकीनंतर पावसाळी अधिवेशनात चांगलीच खडाजंगी झाली होती. विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकल्यामुळे सत्ताधारी आमदार आक्रमक झाले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा झाली आहे.
काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे या भेटीसाठी भुजबळ यांनी त्यांच्याकडे वेळ मागितली नव्हती. या भेटीत भुजबळ यांनी मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती शरद पवार यांना केली होती. भुजबळ यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. पण ही भेट फक्त आरक्षण आणि राज्यातील सध्याच्या सामाजिक स्थितीबद्दल होती, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले होते
