टीम इंडिया अंतिम फेरीत


उपांत्य फेरीत इंग्लंडला हरवून वचपा काढला
गयाना
टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडवर 68 धावांनी मात करत 2022 च्या पराभवाचा वचपा काढला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं.मात्र टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडने लोटांगण घातलं. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला 103 धावावंर गुंडाळलं. टीम इंडियाची ही टी 20 वर्ल्ड कप इतिहासात फायनलमध्ये पोहचण्याची तिसरी आणि 2014 नंतर पहिली वेळ ठरली आहे.
इंग्लंडकडून हॅरी ब्रूक याने सर्वाधिक 25 धावा केल्या. कॅप्टन जॉस बटलर 23, जोफ्रा आर्चर 21 आणि लियाम लिविंगस्टोनने 11 धावांचं योगदान दिलं. जॉनी बेयरस्टो आला तसाच झिरोवर आऊट होऊन गेला. तर 5 जणांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. रीसे टोपली 3 धावांवर नाबाद राहिला. टीम इंडियाकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या जोडीने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर दोघे रन आऊट झाले.
दरम्यान त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 7 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. टीम इंडियासाठी रोहितने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली.सूर्यकुमार यादवने 47 धावांचं योगदान दिलं. हार्दिक पंड्याने 23 धावांची विस्फोटक खेळी केली. रवींद्र जडेजाने नाबाद 17 धावा केल्या. अक्षर पटेलने 10 रन्स केल्या. विराट कोहलीने 9 आणि ऋषभ पंतने 4 धावांचं योगदान दिलं. तर अर्शदीप सिंहने नाबाद 1 धाव केली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर आदिल रशीद, सॅम करन, जोफ्रा आर्चर आणि रिस टोपली या चौघांनी 1-1 विकेट घेतली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!