अमेरिकेचा सुपर विजय


पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करत रचला इतिहास

वॉशिंग्टन
वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत माजी चॅम्पियन पाकिस्तान संघावर नवख्या अमेरिका संघाविरुद्ध पराभवाची नामुष्की ओढवली. अमेरिका संघाने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत करत इतिहास रचला आहे.सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने अमेरिकेला विजयाचे श्रेय देताना आपल्या फिरकटीपटूंवर पराभवाचे खापर फोडले आहे.
डल्लासमधील ग्रँड प्राइरे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या लढतील अमेरिकेच्या नवख्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर बाबर आझमच्या सर्वाधिक 44 आणि शदाब खानच्या 40 धावांच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकात 7 विकेट गमावत 159 धावा केल्या. अमेरिकेकडून नोशतुथ केनिंगेने सर्वाधिक 3, तर मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरने 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने अर्धशतकीय खेळी केली. मात्र तो बाद झाल्यानंतर अमेरिकेचा संघ जलद धावा करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे शेवटच्या षटकात त्यांना विजयासाठी 15 धावांची आवश्यकता होती. पहिल्या 3 चेंडूवर केवळ 3 धावा झाल्यामुळे पाकिस्तान हा सामना जिंकेल असेच वाटत होते. पण चौथ्या चेंडूवर जोन्सने षटकार संघाचे आव्हान कायम ठेवले. यानंतर पाचव्या चेंडूवर एक धाव निघाली आणि शेवटच्या चेंडूवर नितीश कुमारने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला.
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने सुपर ओव्हर टाकली आणि अमेरिका संघाने 18 धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरला सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. इफ्तिकारने एक चौकार लगावत आव्हान सामन्यात कायम ठेवण्याचे प्रयत्न केले, पण त्यानंतर मोठा मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. यानंतर 40 धावांची खेळी करण्याच्या शदाब खान फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, पण सौरभ नेत्रावळकरच्या टिच्चून माऱ्यासमोर पाकिस्तानला 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यासह अमेरिकेने स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे त्याचे आता एकूण 4 गुण झाले आहेत.

Advertisement

बाबर आझम म्हणाला की, फलंदाजी करताना पहिल्या 6 षटकांमध्ये आम्हाला चांगली कामगिरी करता आली नाही. सतत विकेट पडत असल्यामुळे बॅकफूटवर होतो, एक फलंदाज म्हणून आम्हाला भागीदारी करणे आवश्यक होते, पण आम्ही पहिल्या 6 षटकांमध्ये धावा करण्यात अपयशी ठरलो. आमच्या फिरकीपटूंनाही मधल्या षटकांमध्ये विकेट घेता आली नाही. त्यामुळे विजयाचे संपूर्ण श्रेय अमेरिकेला जाते. त्यांनी तिन्ही विभागांमध्ये आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. खेळपट्टीवर दुतर्फा थोडा ओलावा होता आणि एक चांगला खेळाडू म्हणून तुम्हाला परिस्थितीचे मूल्यांकन करणे आवश्यक असते, ते आम्हाला करता आले नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!