प्रज्वल रेवण्णा शरण येणार


सेक्स स्कँडल प्रकरणी व्हिडीओ जारी करून दिली माहिती
बेंगलुरु
जवळपास तीन हजार व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर उघड झालेलं प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकर गेल्या महिन्याभरापासून देशभर चर्चेत आहे.आता स्वत: प्रज्वल रेवण्णानं एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून त्याची या प्रकरणावर भूमिका मांडली आहे.हा व्हिडीओ एशियानेट सुवर्णा न्यूज या कन्नड वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रज्वल रेवण्णानं आपण ३१ मे रोजी भारतात येणार असून एसआयटीसमोर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचं सांगितलं आहे.
ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत कर्नाटकमध्ये उघड झालेल्या या प्रकरणामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त जनता दलाची प्रतिमा वादात सापडली होती. नुकतंच देवेगौडा यांनी स्वत: त्यांचा नातू प्रज्वल रेवण्णावर कारवाई करण्याचं आवाहन तपास यंत्रणांना केलं होतं. तसेच, त्याला भारतात परत येण्याचंही आवाहन त्यांनी केलं. जवळपास महिन्याभरापूर्वी कर्नाटकमधील मतदानानंतर हे सगळं प्रकरण उघड झालं. प्रज्वल रेवण्णाच्या ड्रायव्हरनंच या सगळ्या क्लिप असणारा पेनड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केला. त्यानंतर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णाचा शोध सुरू केला. मात्र, तोपर्यंत तो विदेशात फरार झाला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटिसाही काढण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्याभरात त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. तसेच, त्याच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर कोणतंही भाष्य किंवा बाजू मांडण्यात आली नव्हती. अखेर त्यानं एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याची भूमिका मांडली असून तो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
“मी स्वत: शुक्रवारी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता एसआयटीसमोर हजर राहीन आणि तपासात सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांना आणि दाखल गुन्ह्यांना मी उत्तर देईन. माझा न्यायालयावर विश्वास आहे. मला विश्वास आहे की माझ्यावर करण्यात आलेल्या चुकीच्या आरोपांमधून मी न्यायालयाच्या मदतीने सहीसलामत बाहेर पडेन”, असं प्रज्वल रेवण्णा या व्हिडीओ संदेशात सांगत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!