टीव्ही डिबेट शोमध्ये हाणामारी
काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा,अनेक जण जखमी
भोपाळ
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शनिवारी रात्री एका टीव्ही वृत्तवाहिनीच्या डिबेट शोदरम्यान भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यादरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार लाथा-बुक्क्यांनी मारामारी झाली आणि एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या, त्यामुळे काही जण जखमी झाले. मारामारीचा आणि खुर्च्या फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जबलपूर शहरातील भंवरताल पार्कमध्ये टीव्ही डिबेट शो सुरू होता. या कार्यक्रमाला भाजप आणि काँग्रेसचे स्थानिक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरावरून दोन्ही पक्षांमध्ये वादावादी झाली आणि प्रकरण इतके वाढले की काही वेळातच हाणामारी आणि गदारोळ सुरू झाला. या मारामारीत दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ओमटी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही पक्षांच्या तक्रारी नोंदवून तपास सुरू केला.
भाजपचे आमदार अभिलाष पांडे आणि काँग्रेसचे माजी आमदार विनय सक्सेना यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक वरिष्ठ नेते जबलपूर शहरातील भंवरताल भागात टीव्ही डिबेट शोमध्ये सहभागी झाले होते. कुठल्यातरी प्रश्नावर झालेल्या चर्चेने वादाचे स्वरूप धारण केले. यानंतर दोन्ही बाजूंनी शिवीगाळ व खुर्च्या फेकण्यास सुरुवात झाली. गोंधळ झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांनी पोलिस ठाण्यात येऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या तक्रारी दाखल केल्या.
