अभिनेत्री नूर मलाबिका दासची आत्महत्या


मुंबई
‘द ट्रायल’ या वेबसीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री नूर मलाबिका दास हिने आत्महत्या केली आहे. ३७ वर्षीय अभिनेत्री यापूर्वी कतार एअरवेजमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती.पोलिसांनी ६ जून रोजी लोखंडवाला येथील तिच्या फ्लॅटमधून मृतदेह ताब्यात घेतला. अभिनेत्रीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. त्यांनी तत्काळ ओशिवरा पोलिस स्थानकात याबाबत माहिती दिली. पथक घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी दरवाजा तोडला आणि आत गेल्यावर पोलिसांना नूरचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेला आढळला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता औषधे, मोबाईल फोन व डायरी जप्त केली.
अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आला. तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला मात्र कोणीही पुढे आले नाही. परिणामी, शहरातील बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या एनजीओच्या मदतीने पोलिसांनी रविवारी, ९ जून रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
नूर मलाबिका ही मूळची आसामची होती. याआधी अभिनेत्रीने अनेक हिंदी चित्रपट व वेबसीरिजमध्ये काम केले होते. यामध्ये ‘सिसियान’, ‘वॉकमन’, ‘तिखी चटणी’, ‘जघन्या उपया’, ‘चरम सुख’, ‘देखी उंडेखी’, ‘बॅकरोड हस्टल’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ती डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित ‘द ट्रायल’ मध्ये काजोल व जिशु सेनगुप्ताबरोबर दिसली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!