आमदार पी. एन. पाटील यांचे निधन
काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
कोल्हापूर :
काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटीलयांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली.वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधी घराण्याच्या विश्वासू म्हणूनच आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख झाली. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी.एन. पाटील यांची ओळख राहिली. पी. एन. पाटील यांच्यावर रविवारी सकाळी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
दरम्यान, कोल्हापूर लोकसभेला काँग्रेसकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात असल्याने आमदार पी. एन. पाटील यांनी करवीर मतदारसंघासह जिल्ह्यात झंझावाती प्रचार केला होता. कोल्हापूर लोकसभेला सहा विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक 80 टक्के मतदान झाले होते. करवीर विधानसभा मतदारसंघातून पी. एन. पाटील आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील प्रचाराची धुरा एकहाती सांभाळली होती. लोकसभा निवडणुकीसाठी पी. एन. पाटील यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र, वय आणि प्रकृती लक्षात घेत त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.
