मटण न खाणारे,दारू न पिणारे गाव
बिहारच्या गया जिल्ह्यातील वजीरगंज परिसरात बिहिआइन गाव
गया :
भारतामध्ये एक गाव असे आहे ज्याठिकाणी सर्वजण 100 टक्के शाकाहारी आहेत. याठिकाणी मटण, मासे, दारूचे सेवन करण्यास पूर्णपणे मनाई आहे. हे गाव बिहारच्या गया जिल्ह्यातील वजीरगंज परिसरात आहे. या गावाचे नाव बिहिआइन असे आहे. या गावाला शाकाहारी गाव असेही म्हटले जाते. हे गाव संपूर्ण परिसरात प्रसिद्ध झाले आहे.
या गावात फक्त पूजा अर्चना किंवा धार्मिक महिन्यातच नव्हे तर याठिकाणी मांसाहार आणि दारूचे सेवन न करणे अनेक पिढ्यांपासून बंद आहे. गावात ब्रह्म बाबाचे मंदिर आहे. त्यांच्या कोपामुळे आजपर्यंत येथील लोक मांस, मासे किंवा दारूचे सेवन करत नाहीत.गया जिल्ह्यातील या गावाची चर्चा सर्वत्र होते. याठिकाणी 40 घरांची लोकसंख्या आहे. प्रत्येक समाजातील लोक याठिकाणी राहतात. यामध्ये बहुतांश राजपूत समाजाचा समावेश आहे. अनेक पिढ्यांपासून अत्यंत कठोरपणे या परंपरेचे पालन केले जात आहे.
जर कुणी मांसाहार किंवा दारू सेवन करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीच्या घरासोबत दु:खद घटना घडते. त्यांचे कुटुंब वाढत नाही या भीतीने गावातील लोक मांस, मासे याला स्पर्शही करत नाहीत. विशेष फक्त गावातील लोक या परंपरेचे पालन गावातच नाही तर गावाबाहेरही करतात. ज्या-ज्याठिकाणी राहतात त्या सर्व ठिकाणी या परंपरेचे पालन केले जाते.गावात नववधू आल्यावर तिलाही या परंपरेचे पालन करावे लागते. तिला लग्नापूर्वीच या परंपरेबाबत सांगितले जाते. तसेच जर एखाद्या व्यक्तीने चूकून दारू, मांस किंवा मासे याचे सेवन केले तर त्याला गावाबाहेर अंघोळ केल्यावरच गावात प्रवेश दिला जातो.
गावात नवीन पीक काढल्यानंतर सर्वात आधी ब्रह्माबाबांना नैवेद्य दाखवला जातो, असेही स्थानिक सांगतात.
