पत्नीपीडित पुरुषांची पिंपळपौर्णिमा
ही पत्नी 7 सेकंदही नको अशी प्रार्थना
छत्रपती संभाजीनगर
वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण मानला जातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक वेगळंच चित्र पहायला मिळाले. पत्नीपीडित पुरुषांनी वटपौर्णिमेनिमित्त पूजा केली, मात्र त्यांनी वडाची नाही तर पिंपळाची पूजा केली. यावेळी पत्नीपीडित पुरुषांनी यमराजाकडे प्रार्थना केली की, आम्हाला ही पत्नी 7 जन्म काय 7 सेकंदही नको.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरालगत असलेल्या करोडी येथे पत्नीच्या त्रासाला कंटाळून जगणे मुश्कील झालेल्या पत्नीपीडित पुरुषांच्या हक्कासाठी कुटुंबीय समस्या पुरुष संघटना स्थापन करण्यात आली आहे. याठिकाणी गेल्या 8 वर्षांपासून पत्नीपीडित पुरुष पिंपळपौर्णिमा साजरी करून पिंपळाला साकडं घालतात. बायकोच्या त्रासाला कंटाळून आयुष्यभर तिच्यासोबत राहणं अवघड आहे, मग 7 जन्म कसं राहणार, असा सवाल करत पत्नीपीडित संघटनेकडून पिंपळपौर्णिमा साजरी करण्यात आली. ज्या-ज्या नवऱ्यांना बायकोकडून त्रास झाला आहे, असे सगळे नवरे यावेळी “आमच्या बायका वटवृक्षाला खोटंनाटं बोलून साकडं घालतील, त्यांचं ऐकू नका, पत्नीपीडितांची पत्नीपासून सुटका व्हायलाच हवी”, असं साकडं पिंपळला घालतात.
संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी सांगितले की, महिला अबला होत्या त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी वेगवेगळे कायदे बनवले गेले. परंतु सदर कायदे तयार होताना पुरुषांवर अन्याय होऊन पुरुष “अबला” होतील, याचा विचारच न केल्याने आज खऱ्या अर्थाने पुरुष हतबल झाला आहे. त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी एकतर्फी कायदे रद्द होऊन पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे,
दरम्यान, भारत फुलारे म्हणाले की, देव आमचं म्हणणं ऐकेल आणि दुष्ट बायकांच्या तावडीतून आमची सुटका करेल यासाठी पत्नीपीडित पुरुष आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी केली जाते. कारण पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग असावा, एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, कौटुंबिक वाद न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे, अशा पत्नीपीडित पुरुषांच्या मागण्या आहेत.
