उत्तर महाराष्ट्र केसरीची हत्या
अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार आणि कोयत्याने वार
नाशिक
नाशिक मुंबई महामार्गावर उत्तर महाराष्ट्र केसरी भूषण लहामगेची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर करिश्मा ढाब्याजवळ भूषण लहामागेच्या हत्येचा थरार घडला आहे. मारेकरी दुचाकीवरून येऊन गोळ्या झाडून आणि एकाने कोयत्याने वार करून ही हत्या केल्याची घटना प्रत्यक्ष दर्शनी झाल्याच्या सांगितले आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी बंदुकीने फायर करून नंतर धारधार शस्त्राने वार केला. यात भुषणचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यातच भूषण हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन मारेकरी दुचाकीवर आले. तर दोन मारेकरी घटनेच्या ठिकाणी दबा धरून बसले होते. ही घटना घडली त्यावेळी मारेकऱ्यांनी भुषणला रस्त्यात अडवून पहिले त्याच्या पाठीवर दोन गोळ्या फायर केल्या. नंतर धारधार शस्त्राने त्याच्यावर वार केले. त्यात भूषण गंभीर जखमी झाला. मात्र काही वेळाने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. भूषण हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्यामुळे आजूबाजूला असलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. भूषणची हत्या करून आरोपींनी तेथून इगतपुरीच्या दिशेने पळ काढला. हत्या का आणि कशामुळे झाली? याचे कारण समजू शकले नाही.
भुषण हा इगतपुरी तालुक्यात कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध होता. तो शेती तसेच दुधाचा व्यवसाय करीत होता. मात्र ही हत्या मागील भांडणाची कुरापत काढून झाली असावी, असा देखील अंदाज लावला जातो आहे. भूषण हा घरी असलेल्या म्हशींसाठी चक्कीतले पीठ घेऊन तो आपल्या गावी सांजेगाव येथे जात होता. आज सकाळपासून तो नाशिकमध्ये आला होता. काही बाजार करून आणि शहरातील सिडको येथील चक्कीतून म्हशींना पीठ घेऊन तो दुचाकीने जात होता. त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या संशयितांनी त्याचा रस्ता अडवून त्याची हत्या केली.
कुस्तीपटू असलेल्या भुषणने जिल्हा, विभाग स्तरावर कुस्ती स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळविले होते. मात्र ही घटना घडल्यानंतर तात्काळ स्थानिकांनी वाढीवरे पोलिसांना घटनेची माहिती दिली. वाडीवऱ्हे अन् ग्रामीण पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी पंचनामा करून भुषणचा मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवला. तेथे त्यावर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी भुषणचे नातेवाईक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही हत्या नेमकी कशामुळे झाली या संदर्भात ग्रामीण पोलीस आता तपास करत आहेत.
