शैक्षणिक संस्थेला 513 कोटीची देणगी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासचा विक्रम
नवी दिल्ली :
भारतात मंदिरांना मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीची नेहमीच खूप चर्चा होत असते; पण एका शैक्षणिक संस्थेला करोडोंच्या देणग्या मिळाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? विशेष म्हणजे ही देणगी संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिली आहे.रेकॉर्ड ब्रेक डोनेशन मिळवणारी ही संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मद्रास होय. या संस्थेने आर्थिक वर्ष 2023-24मध्ये माजी विद्यार्थी, उद्योग आणि वैयक्तिक देणगीदारांकडून विक्रमी 513 कोटी रुपयांची उभारणी केली आहे.
इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेला गेल्या आर्थिक वर्षात माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट भागीदारांकडून एकूण 717 कोटी रुपयांच्या नवीन कमिटमेंट मिळाल्या आहेत. आयआयटी मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांनी सांगितलं की या पैशांचा वापर तंत्रज्ञान संशोधन आणि विकासाव्यतिरिक्त संस्थेद्वारे आधीच विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या सामाजिक गरजांवर देशातल्या विविध भागांत प्रसार करण्यासठी केला जाईल. याशिवाय या रकमेचा वापर पात्र विद्यार्थांना शिष्यवृत्ती देण्यासाठी आणि अन्य योग्य कार्यक्रमांसाठी केला जाईल.
सलग दुसऱ्या वर्षी आयआयटी मद्रासने तांत्रिक संशोधन, विद्यार्थी प्रकल्पांसह कॅम्पसमधील आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शैक्षणिक संस्थेद्वारे सर्वाधिक निधी उभारण्याचा नवा रेकॉर्ड केला आहे. कामकोटी म्हणाले, “513 कोटी रुपयांची ही ऐतिहासिक पातळी 2022-23 सत्रात उभारलेल्या 218 कोटींच्या रकमेपेक्षा 135 टक्के जास्त आहे. संस्थेला एक कोटींहून जास्त रक्कम देणाऱ्या देणगीदारांची संख्या 48 असून त्यात 16 माजी विद्यार्थी आणि 32 कंपन्यांचा समावेश आहे.”
फंड उभारणीचं नेतृत्व आयआयटी मद्रासच्या संस्थात्मक प्रगती कार्यालयाने केलं होतं. ते आयआयटी मद्रास माजी विद्यार्थी चॅरिटेबल ट्रस्टच्या देखरेखीखाली होतं. वर्ष 2023-24मध्ये फक्त माजी विद्यार्थ्यांनी 367 कोटी रुपयांचं योगदान केलं होतं. ते एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 282 टक्के जास्त आहे
