भाकरी भारताची,चाकरी पाकिस्तानची


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर टीका
नंदुरबार :
निवडणूक आल्यावर काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ, हे सिद्ध झाले आहे. भाकरी खायची भारताची आणि चाकरी करायची पाकिस्तानची अशा देशद्रोही काँग्रेसला निवडणुकीत हद्दपार करा, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. हीना गावीत यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
पूर्वी काँग्रेसचा प्रचार नंदुरबारमधून सुरु व्हायचा. पण त्यांनी इथल्या आदिवासींना मतांपुरते वापरले. त्यामुळे नंदुरबारची जनता याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबारमध्ये आले आहेत. त्यामुळे ४ जूनला डॉक्टर हिना गावित यांच्या विजयाची शुभ वार्ता पक्की झाली आहे. डॉक्टर हिना गावित गेल्या पाहिजेत दिल्लीत आणि गोवाल पाडवी राहिले पाहिजेत गल्लीत, असे नंदुरबारच्या जनतेने ठरवले असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ही निवडणूक महासत्ता घडवणारी आहे. पाकिस्तानचा कंबरडा मोडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. विरोधकांकडे पाकिस्तानची तळी उचलणारे आहेत. आपल्याकडे गरीब कल्याणाचा झेंडा आहे तिकडे बेईमानीचा झेंडा आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली. २०१४ मध्ये विरोधकांनी मोदींवर आरोप केले तेव्हा त्यांचा पराभव झाला. २०१९ ला पुन्हा मोदींवर आरोप केले तेव्हा जनतेने विरोधकांचा सुपडा साफ झाला. आता २०२४ मध्ये जनता विरोधकांना कायमचं घरी बसवणार आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!