अमेरिकेत ‘स्वरगंधर्वचे 100 शोज हाऊसफुल्ल
संगीतकार, गायक सुधीर फडके यांची लोकप्रियता
मुंबई
‘गीतरामायणा’ला स्वरसाज देणारे संगीतकार, गायक सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी यांची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला.सातासमुद्रापार परदेशातही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.अमेरिकेत या चित्रपटाचे १०० शोज ‘हाऊसफुल’च्या दिशेने वाटचाल करत आहेत.
प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात हा चित्रपट यशस्वीही झाला. केवळ प्रेक्षकच नाही तर श्रीधर फडके, आशा भोसले यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. समीक्षकांनीही ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ला आपली पसंती दर्शवली.
एकंदरच काय तर चोहोबाजुंनी चित्रपटात तुफान कौतुकाचा वर्षाव होत आहे. असे असताना तर चित्रपटाला अनेकांनी ५ स्टार्स रेटिंगसुद्धा दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट ग्लोबली ‘सुपरहिट’चे बिरुद मिरवत आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट दुबई, लंडन आणि जर्मनीमध्येही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
या यशाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ‘परदेशात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही शोज हाऊसफुल्ल झाले होते. महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच परदेशातील प्रेक्षकही इतके प्रेम या चित्रपटावर करत आहेत, हे खरंच भारावणारे आहे. बाबूजी हे नावच इतके मोठे आहे की, त्यांची ख्याती जगभरात आहे. आजही त्यांची गाणी अजरामर आहेत. तरुणाईही त्यांची गाणी तितक्याच आत्मीयतेने ऐकते. चित्रपटाबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्याच कलाकारांचे कौतुक होत आहे. एका टीमला यापेक्षा जास्त काय हवे. मी सगळ्याच प्रेक्षकांचा मनापासून आभारी आहे’
