खडूसपणाची जिरवली,वेल डन इंडिया
विश्लेषण/शरद महाजनी
भारत इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला,तो भारतीय क्रिकेटपटूंच्या जिगरबाज खेळीमुळे! पण कालची मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इंग्लंड खेळाडूंचा खडूसपणा जडेजा आणि कंपनीने जिरवला.
खडूसपणा हा त्यांच्या रक्तातच भिनलेलाआहे. त्यांना फक्त विजय साजरा करता येतो. पराभव किंवा नाचक्की पचवता येत नाही. एखाद दुसरा अपवाद वगळता इंग्लिश क्रिकेटर,मिडिया ही अशीच खुनशी आहे. त्या प्रमाणात प्रेक्षक बरे म्हणायचे.पण खेळाडूंची परंपरा कायम आहे ती खडूस म्हणून.अशा वेळी त्यांना जशास तसे उत्तर देत त्यांचे नाक ठेचण्याची प्रवृत्ती प्रथम सौरव गांगुली,विराट कोहली यांनी दाखवली. आता शुभमन गिल,रवी जडेजा,सिराज ती वृत्ती दाखवत आहेत.ते पाहताना आनंद होतो. अन् तो साजराही करावा असे वाटते.
सामना अनिर्णित राहणार हे स्पष्ट झाले तेव्हा शेपूट घालून जडेजाशी हात मिळवण्याची खडूस वृत्ती लढाऊ बाणा असलेल्या बेन स्टोक्स याने दाखवावी आणि वर तोंड करून म्हणावे की ‘तुला ब्रुक्सचा सामना करत शतक करायचं आहे का ?’
…कसली ही नीच वृत्ती?अरे बेन,त्याच्या आधी चार तास तुझ्यासह अव्वल गोलंदाज बोलिंग करत होते तेव्हा हाच बाप तलवार परजत लढत होता ना..सोबत सुंदर सारखा लढाऊ सरदार घेऊन ? तेव्हा तुझे तोंड का बंद होते??जडेजा, सुंदर हे शतकाचे मानकरी होत असताना खिलाडू वृत्ती तू आणि गोऱ्या रंगाच्या खेळाडूंनी दाखवायला हवी होती.तुझ्याशी बोलताना जडेजा संयम ठेवून बोलत होता.’हा निर्णय मी नाही, गिल घेऊ शकतो.’ असे बजावत होता.पण तुमची जिरली होती, तीही घरच्या मैदानावर.. हे दुःख तुला पचवता येत नव्हते.सामना अनिर्णित राहिला आणि जडेजा तुला हात मिळवण्यासाठी पुढे आला,तेव्हा तू तो आधी झिडकारलास,नाईलाज म्हणून तो कसा तरी हाती घेतलास हे जगाने पाहिले राजा…
आता पाचव्या कसोटीत तरी मोकळ्या, खुल्या मनाने मैदानावर उतर.तुझे आम्ही स्वागत करू.पण तोच खडूसपणा घेऊन पुन्हा आलास तर तू कितीही मोठा खेळाडू असलास तरी आमच्या लेखी तुझी नोंद खडूस क्रिकेटर म्हणूनच केली जाईल…!

