फडणवीस यांचा गौप्यस्फोट


शिंदेंच्या बंडादरम्यान ठाकरेंनी दिली होती ऑफर
मुंबई:
दोन वर्षांपूर्वा एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड केलं.शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून कॉल केल्याचा आणि ऑफर दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.शिंदे यांच्या बंडाला ४० आमदारांनी साथ दिली. त्यामुळे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. त्यावेळी घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
‘२०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं. सेनेच्या आमदारांसह ते सूरतला रवाना झाले. शिंदेंना साथ देणाऱ्या आमदारांची संख्या हळूहळू वाढत गेली. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी त्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून मला कॉल केला होता. ठाकरेंनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती,’ असा दावा फडणवीसांनी केला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी दोनच दिवसांपूर्वी असाच दावा केला होता. ‘आम्ही मुंबईवरुन सूरतला गेलो. आम्ही लपतछपत गेलो नव्हतो. एकीकडे आम्हाला परत बोलावण्याचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे आमचे पुतळे जाळले जात होते. पक्षातून आमची हकालपट्टी सुरू होती. त्याचवेळी भाजपच्या नेतृत्त्वासोबत फोनवरुन चर्चाही केली जात होती. उद्धव ठाकरे भाजपच्या नेतृत्त्वाला म्हणाले, तुम्ही यांना (शिंदेंना) कशाला सोबत घेता? त्यापेक्षा आम्हीच तुमच्याबरोबर येतो. ठाकरेंनी ही ऑफर भाजपला दिली होती. पण आम्ही गेल्यानंतर ठाकरेंकडे काही राहिलं होतं का?’ असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला होता.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसैनिकांचं खच्चीकरण सुरू होतं. ते थांबवण्यासाठी, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही टोकाचं पाऊल उचललं. आम्ही घेतलेला निर्णय धाडसी होता. पण त्यासाठी लागणारी हिंमत आमच्याकडे होती. आम्ही हिंमत दाखवली, असं शिंदे दोनच दिवसांपूर्वी म्हणाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!