सलमान गोळीबार प्रकरणातील संशयिताची आत्महत्या
तुरुंगात चादरीने गळफास लावून घेतला
मुंबई
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीने तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली आहे. अनुज थापन असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.त्याने आज बुधवारी तुरुंगात चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. या आरोपीला गंभीर अवस्थेत तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे तुरुंगातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अनुज थापन व सोनू चंदर या दोघांना अटक केली होती. यापैकी अनुज थापन याने बुधवारी तुरुंगात चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब तुरुंगातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला लगतच्या GT रुग्णालयात हलवले. तिथे डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनुज थापन याच्यावर हल्लेखोरांना शस्त्र उपलब्ध करून देण्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकत्याच्या त्याच्या पंजाब येथून मुसक्या आवळल्या होत्या.
सलमानच्या घरावर 14 एप्रिल रोजी पहाटे 4.15 च्या सुमारास गोळीबार झाला होता. हल्लेखोरांनी एकूण 4 गोळ्या बंगल्याच्या दिशेने झाडल्या. त्यापैकी एक गोळी घरात शिरली, तर उर्वरित घराच्या भिंतीवर लागल्या. पोलिसांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी गुजरात व पंजाबमधून प्रत्येकी 2 अशा एकूण 4 जणांना अटक केली होती.
गोळीबाराच्या घटनेनंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने फेसबुक पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या नावाचीही या प्रकरणात आरोपी म्हणून नोंद केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सागर पाल व विकी गुप्ता या दोघांनी हा हल्ला केला. यापैकी विकी गुप्ता हा दुचाकी चालवत होता, तर सागर पालने प्रत्यक्ष गोळीबार केला. हे दोघेही बिहारचे आहेत.
